
उद्योगधंद्यांसाठी जमिनी मागण्यासाठी कंपनीचे लोक आले तर त्यांना नुसत्या जमिनी विकू नका तर जितके शेतकरी आहेत तेवढय़ा शेतकऱयांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱयांना केले. जमिनी घेऊन उद्योगधंदे उभारणाऱयांच्या कृतीतून महाराष्ट्राला, मराठी माणसाला नख लागतंय हे कळले तर तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग उभारू देणार नाही, असेही राज ठाकरे यांनी ठणकावले.
शेतकरी कामगार पक्षाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन पनवेलमधील पोलीस ग्राऊंडवर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास राज ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार बाळासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडीप्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, मनसेचे बाळा नांदगावकर, राजू पाटील, नितीन सरदेसाई यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लाल बावटय़ाच्या व्यासपीठावर दोन भगवे
1981 मध्ये शिवसेनेचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट असलेले कॉ. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते आणि आज शेकापच्या लाल बावटय़ाच्या व्यासपीठावर दोन भगवे (मनसे आणि शिवसेना) एकत्र आले आहेत, राज ठाकरे म्हणाले.
गुजरातेत बाहेरच्यांना शेतजमीन घेण्यास मनाई
गुजरात टेनन्सी अॅक्टनुसार तेथे इतर राज्यातील कोणालाही शेतजमीन विकत घेण्याची परवानगी नाही. जमीन घ्यायचीच तर ‘फेमा’ कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेची परवानगी लागते. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना त्यांच्या राज्यात कुणीही ढवळाढवळ केलेली चालत नाही. तुमची राज्ये सुरक्षित ठेवता मग महाराष्ट्रातच का गोंधळ घालता? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.