विधानसभेला सरकारी गाडीतून पैशांचे वाटप झाले, निवडणूक आयोगाला फोटो आणि क्लिप्स देऊनही उपयोग नाही; कैलास गोरंट्याल यांच्या आरोपाने खळबळ

जालना विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत सरकारी गाडय़ांमधून वारेमाप पैसा वाटला गेला. यासंदर्भात आम्ही फोटो, व्हिडीओ क्लिपसह निवडणूक आयोगाकडे तक्रार केली; परंतु काहीही उपयोग झाला नाही, असा गौप्यस्फोट नुकतेच भाजपवासी झालेले जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जालना मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये दाखल होताच एका वृत्तवाहिनीवर कैलास गोरंट्याल आणि मिंधे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आमने सामने आले. यावेळी
कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पैशाच्या वाटपाचा पर्दाफाशच केला. हल्ली लक्ष्मीनारायण भेटत नाही तोपर्यंत लोक मतदान करत नाहीत, असेही गोरंट्याल म्हणाले.

गोरंट्याल आणि खोतकर यांच्यातील जुगलबंदी

कैलास गोरंट्याल अर्जुन खोतकर यांच्याकडे दोनदा ईडी आली. तिसऱ्यांदा पण ईडी येणार आहे. त्याला धुळे प्रकरणात फडणवीसांनी एवढा झापला, शिंदेंनी झापला. चॅलेंज देतो, याला घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जा, मुख्यमंत्री काय बोलतात बघा. मुख्यमंत्र्यांकडे काय वजन आहे याचे? धुळे प्रकरणात याच्याकडे पुन्हा ईडी येणार. सर्वांना माहिती आहे तू काय आहेस!

अर्जुन खोतकर यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 50 खोके बोलणारे आता किती खोके घेऊन गप्प बसले आणि भाजमध्ये गेलेत? भ्रष्टाचार, पाप लपवण्यासाठी तू भाजपमध्ये गेला. त्यांना जेव्हा याचे घोटाळे माहीत पडतील त्यावेळी भाजप बाहेर काढेल या माणसाला पक्षातून. पालिका स्वबळावर लढणार बोलण्याचा अधिकार याला कुणी दिला?

विधानसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा राजरोस गैरवापर करण्यात आला. सरकारी गाडय़ांमधून पैसा वाटण्यात आला. शंभर लोक पैसे वाटत असताना किती लोकांना पकडणार? प्रत्येक गल्लीत पैसे वाटत होते. याला जबाबदार लोकही आहेत.