
‘पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगनगरी अशी ओळख असलेले शहर आहे. अनेक मोठय़ा व नामांकित कंपन्या पुण्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र गुंतवणूकदारांवर दबाव टाकला जातो. उद्योगक्षेत्रात वाढलेली ‘दादा’गिरी विकासात मोठा अडथळा आहे,’ अशी कबुलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या ‘दादा’गिरीपुढे गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनीच हात टेकल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
पुण्यातील काही उद्योग ‘दादा’गिरीला कंटाळून इतर राज्यांत जात आहेत. राजकीय ‘दादा’गिरी पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळत आहे. विविध पक्षांचे हे ‘दादा’ त्या पक्षाचे नाव घेऊन दादागिरी करतात. मी तर ही ‘दादा’गिरी मोडून काढणारच आहे. त्यात जो जो मदत करेल, त्याचे स्वागतच आहे.
महाराष्ट्रात कुठेही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि ग्रामीण एसपी यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कुठल्या पक्षाशी संबंधित लोक उद्योगांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा. तीन-चार वेळेला केस दाखल करून ऐकले नाही, तर ‘मकोका’ लावा.
आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कंत्राट द्या…
‘पुणे हे पूर्वेचे ‘ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते. उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असल्याने कुशल मनुष्यबळ तयार होते. परंतु गुंतवणूक करणाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. ‘आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कत्राट द्या, आम्ही सांगू त्याच दराने काम करा…’ अशी ‘दादा’गिरी सुरू आहे. अशा दबावाखाली गुंतवणूकदारांना काम करावे लागत असेल, तर ते काम करू शकणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.