
कार्तिक आर्यन 15 ऑगस्ट रोजी ह्युस्टनमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम एका पाकिस्तानी कंपनीने आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या घोषणेपासून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयीजने (एफडब्ल्यूआयसीई ) यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशननेदेखील याचा तीव्र निषेध केला आहे, तर कार्तिकने आधीच एक निवेदन जारी करून या प्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.
असोसिएशनने कार्तिक आर्यनसाठी एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे, ‘कार्तिक, तू फक्त एक सुपरस्टार नाहीस, तू हिंदुस्थानच्या तरुण पिढीचा, तिच्या संस्पृतीचा आणि तिच्या अभिमानाचा प्रतिनिधी आहेस. या देशाने तुला सर्वस्व दिले आहे, नाव, प्रसिद्धी, संपत्ती आणि अफाट प्रेम. अशा परिस्थितीत भारतात दहशतवादाला सतत पाठिंबा देणाऱ्या देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुला जोडताना पाहणे हे केवळ निराशाजनकच नाही तर प्रत्येक देशवासीयांसाठी हृदयद्रावकदेखील आहे.’