
महायुती सरकारमधील अनेक मंत्री आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या वादग्रस्त मंत्र्यांची पाठराखण केली आहे. मंत्री कधीकधी गमतीने बोलतात, प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर हे मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरत आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी आज विचारले. त्यावर प्रतिक्रिया देताना, मंत्र्यांच्या भाषणांमधली काही वक्तव्ये महत्त्वाची असतात तर काही चुकीची असतात, कधीकधी ते गमतीनेही बोलतात, असे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीस यांनी शिरसाट यांनी केलेले ‘कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय’ हे विधान चुकीचे वाटत नसल्याचे म्हटले तर बोर्डीकर यांचे बोलणे माध्यमांकडून अर्धवट दाखवण्यात येत असल्याचा दावा करत त्यांनी त्यांचेही समर्थन केले.