
सिराजने दिलेल्या जीवदानाच्या जोरावर संघाला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवणाऱ्या हॅरी ब्रुकचे झंझावाती शतक, त्याला ज्यो रुटची लाभलेली साथ त्यामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठयावर पोहचला होता. सामना संपण्याच्या मार्गावर असताना ढगाळ वातावरण आणि पावसाने अडथळा निर्माण केला आणि ओव्हल कसोटीचा निकाल पाचव्या दिवसापर्यंत लांबला. आता पाचव्या दिवशी कसोटीचा निकाल पहिल्या सत्रातच लागेल. यजमान इंग्लंडला विजयाची अधिक संधी आहे. त्यांना फक्त 35 धावांची गरज आहे तर हिंदुस्थानला मालिका बरोबरी सोडवण्यासाठी फक्त 4 विकेट हव्यात. कसोटीचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा संघातील दोन्ही जॅमी मैदानात होते.
पहिल्या डावातील दोन्ही डाव अडीचशेच्या आत गारद झाले होते. त्यामुळे विजयासाठी मिळालेल्या 374 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडची दमछाक होईल अन् अखेरची पाचवी कसोटी जिंकण्यासाठी उभय संघांची कसोटी लागेल असे वाटत होते, मात्र इंग्लंडने दुसऱ्या डावात हिंदुस्थानची गोलंदाजी निष्प्रभ ठरवत चौथ्याच दिवशी कसोटी आपल्या बाजूने झुकविली. जोश टंग व गस अॅटकिन्सन यांची दोन्ही डावांतील भन्नाट गोलंदाजी अन् जो रुट व हॅरी ब्रुक यांची दुसऱ्या डावातील दणकेबाज शतके ही इंग्लंडने कसोटीवर मिळवलेल्या वर्चस्वाची वैशिष्टय़े होती. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 77 षटकांत 6 बाद 339 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
हिंदुस्थानला 224 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने 247 धावा करीत पहिल्या डावात 23 धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने दुसऱ्या डावात 396 धावसंख्या उभारून यजमान इंग्लंडला विजयासाठी 374 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या 1 बाद 50 धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. बेन डकेट (54) अर्धशतकी खेळी करून बाद झाला. प्रसिध कृष्णाने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. मग प्रभारी कर्णधार ओली पोपही (27) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला मोहम्मद सिराजने पायचीत पकडले.
रूट–ब्रुक जोडीची शतके
इंग्लंडची 3 बाद 106 अशी स्थिती असताना जो रूट व हॅरी ब्रुक ही जोडी मैदानावर जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानी गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. ब्रुकने सिराजकडून मिळालेल्या जिवदानाचा फायदा उठविला. रूटने 152 चेंडूंच्या खेळीत 12 चौकारांसह 105 धावा केल्या, तर ब्रुकने 98 चेंडूंत 111 धावा फटकाविताना 14 चौकारांसह 2 षटकार लगावले. रूट-ब्रुक जोडीने संघाला तीनशेपार नेत सामना इंग्लंडच्या बाजूने झुकविला. आकाश दिपने ब्रुकला सिराजकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर प्रसिध कृष्णाने ब्रुकच्या जागेवर आलेल्या जेकब बेथेलचा (5) त्रिफळा उडविला. मग कृष्णाने पुढच्याच षटकात रूटला यष्टीमागे जुरेलकरवी झेलबाद करीत इंग्लंडला सहावा धक्का दिला.
…तर व्होक्स मैदानात उतरू शकतो
इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची गरज आहे आणि सकाळी त्यांच्या 3 विकेट लवकर पडल्या तर सामन्यातून बाहेर झालेला जखमी ख्रिस व्होक्स इंग्लंडच्या विजयासाठी मैदानात उतरू शकतो. तो त्याची खांदेदुखी विसरून संघाच्या विजयासाठी मोलाचे योगदान देण्यासाठी हातात बॅट घेऊन शकतो.
पहिल्या अर्ध्या तासातच कसोटीचा निकाल
इंग्लंडने आपले 6 फलंदाज गमावले असले तरी ते उद्या आपल्या बॅझबॉल शैलीतच खेळ संपवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासाच कसोटीचा निकाल लागलेला असेल. एकतर इंग्लंडने 3-1 ने मालिका जिंकली असेल किंवा हिंदुस्थानने झटपट विकेट घेत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली असेल.