
महायुती सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा किती माज आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भरसभेमध्ये आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर त्याला जागेवरच बडतर्फ करण्याचा इशारा दिला. यामुळे बोर्डीकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
मेघना बोर्डीकर यांचा यासंदर्भातील व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बाजार समितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरीत करण्यात आली. यावेळी बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले. ‘हमाली करायची तर नोकरी सोडून दे, माझ्यापुढे चमचेगिरी चालणार नाही, तू काय कारभार करतोस मला माहीत आहे, असा वागलास तर कानाखाली वाजवीन, पगार कोण देतंय तुला?’ अशी धमकी त्यांनी दिली. तुला बडतर्फ करायलाच या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बोलावलेय, असेही त्या म्हणाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
रोहित पवार यांनी हा व्हिडीओ पोस्ट करतानाच ‘सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्स बार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे… यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…’ असे म्हटले आहे. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच अशा सज्जन मंत्र्यांमुळे मंत्रिमंडळाची इज्जत जातेय आणि महाराष्ट्राची बदनामीही होतेय असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांना आवर घालण्याची विनंतीही केली आहे.
मेघना बोर्डीकर यांनी या व्हिडीओबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित ग्रामसेवक विधवा महिलांकडे पैसे मागून त्यांना ग्रामपंचायतीच्या एका नेत्याकडे पाठवून त्यांचा छळ करत होता, असा दावा त्यांनी केला आहे.