बिबट्याने पाडला चार कुत्र्यांचा फडशा; एकाच ठिकाणी रोज येरझाऱ्या, डोळखांब परिसरात दहशत

शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरातील चांग्याचापाडा, कथोरेपाडा, साकडबाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. महिनाभरात चार कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. गेल्या आठवड्यात काही घरांजवळ बिबट्या दोनदा सीसीटीव्हीत कैद झाला. एकाच ठिकाणी बिबट्या येरझाऱ्या घालत असल्याने रहिवाशांमध्ये घबराहट पसरली आहे. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी आहे.

डोळखांब परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक जनावरे आणि कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. कथोरेपाडा येथील रवीद्र कथोरे यांच्या घराजवळ दोन रात्री बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. कुत्र्यांच्या भुंकण्याने घरातील माणसांना जाग आल्याने बिबट्याने जंगलात धूम ठोकली. दोनदा बिबट्या कॅमेरात कैद झाल्याने कथोरे कुटुंब हवालदिल झाले असून वनविभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी कथोरेंनी केली आहे.

सातच्या आत घरात
डोळखांब परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे, वाड्या विखुरलेल्या आहेत. बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ सायंकाळ झाली की घराबाहेर पडायला घाबरत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी वनक्षेत्रपाल कार्यालयात वारंवार कळवूनही वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.