बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांची फेरतपासणी, निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पाठवले पत्र

निवडणूक आयोगाने बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्येही मतदार याद्यांची फेरतपासणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना तसे पत्र पाठवले असून तत्काळ मतदार याद्यांची फेरतपासणी सुरू करण्यास सांगितले आहे. दरम्यान, बिहारमध्ये मतदार याद्यांची फेरतपासणी अंतिम टप्प्यात असून 1 ऑगस्ट रोजी मतदार याद्यांचा मसुदा जाहीर करण्यात आला.

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यानंतर तब्बल 65 लाख मतदारांची नावे मतदार याद्यांमधून हटवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. अनेक मतदार असे आहेत जे सध्या हयात नाहीत, तर अनेक मतदार असे आहेत ज्यांनी दुसऱया राज्यात स्थलांतर केले आहे. तसेच काही मतदारांची नावे एकाहून अधिक मतदारसंघात नोंदवण्यात आली आहेत, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रक्रियेला विरोध लावून धरला असून भाजपच्या इशाऱयावर मतदारांची चोरी करण्यात येत असल्याचा आरोपही केला.

देशभरात मतांची चोरी होण्याची भीती- काँग्रेस

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले असून सातत्याने होत असलेल्या मतांच्या चोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मतांची चोरी होत आहे हे आम्ही पाहिले आहे. याची सुरुवात बिहारमधून झाली असून आता संपूर्ण देशभरात हेच होणार आहे. जर निवडून आलेले लोकप्रतिनिधीच लोकसभेत निवडणुकांवर चर्चा करू शकत नाहीत तर याहून मोटा लोकशाहीचा अवमान आणखी काय असू शकतो? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवरून केला आहे.

तेज प्रताप यादव यांची व्हीव्हीआयपीसोबत आघाडी

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा व माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी ‘विकास वंचित इन्सान पार्टी’सोबत आघाडी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राजद व काँग्रेसलाही निमंत्रण दिले आहे.