ठसा – डॉ. शुभांगी भडभडे

<<< महेश उपदेव >>>

पद्मगंधा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या साहित्यसाधक व विदर्भातील साहित्यिकांना एका सूत्रात बांधणारा धागा गेल्या आठवड्यात तुटला. कादंबरी चरित्राच्या माध्यमातून जिवंत ठेवणारा प्रसिद्ध राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार डॉ. शुभांगी भडभडे यांचे निधन झाले.

वयाची 83 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही नित्य लेखन करणाऱ्या शुभांगी भडभडे शेवटपर्यंत साहित्यसाधक म्हणून कार्यरत राहिल्या. 80 कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, वैचारिक, स्फुट असे विपुल लेखन त्यांनी केले आहे. चरित्रात्मक कादंबरी ही त्यांची विशेष ओळख. शुभांगी भडभडे साहित्य क्षेत्रातील उत्तम संघटकही होत्या. वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ देण्यासाठी त्यांनी पद्मगंधा प्रतिष्ठानची स्थापना केली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले. अनेक नव्या लेखिकांना लिहिते केले.

अलीकडे प्रकाशित झालेली त्यांची ‘राजयोग’ (स्वयंसेवक ते प्रधानसेवक ः एक देदीप्यमान यात्रा) ही कादंबरी प्रत्यक्ष मोदींना भेटून त्यांनी त्यांना दिली होती. ‘बकुळीची फुलं’ ही कादंबरी त्यांनी त्यांच्या जीवनावर लिहिली. त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास त्यात लिहिला आहे. 80 हून अधिक कादंबऱ्या लिहिताना त्यांनी चरित्रलेखनाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी चरित्रलेखन केले होते.

‘मृत्युंजयाचा महायज्ञ’ ही कादंबरी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर लिहिली, तेव्हा त्याला ‘ऑडियो बुक’मध्ये रूपांतरित करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला सहर्ष होकार दिला आणि ते काम पूर्ण झाले. ‘बकुळीची फुलं’ ही कादंबरी त्यांनी त्यांच्या जीवनावर लिहिली. त्यांनी त्यांचा पूर्ण प्रवास त्यात लिहिला आहे. नुकत्याच महाकवी कालिदास जीवनगौरव पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या होत्या. शुभांगीताईंची मुंबई ही जन्मभूमी व नागपूर ही कर्मभूमी होती.

शुभांगी भडभडे यांना बालपणातच आई सुधा फडणवीस व मामा रा. शं. वाळिंबे यांच्याकडून लेखनाचा वारसा मिळाला. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी लिखानाला सुरुवात केली. 1978 ला त्यांची ‘समाधी’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. यानंतर त्यांची 80 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांच्या कादंबरीवर आधारित नाटकांचे देशातच नव्हे तर विदेशातही मंथन झाले. पद्मगंधा साहित्य

प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना लिहिते केले. सलग 30 वर्षे त्या पद्मगंधाच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या 24 चरित्रात्मक कादंबऱ्या, 22 सामाजिक कादंबऱ्या, 10 कथासंग्रह, 10 द्विअंकी नाट्यलेखन, 13 एकांकिका, बालसाहित्यावर 10 पुस्तके, प्रवासवर्णन, ललित लेख अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या साहित्यावर विद्यार्थी पीएचडी व एफफील करतात. राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. विविध साहित्य परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या साहित्यावर आधारित ‘इदं न मम’ (268 प्रयोग) व ‘स्वामी विवेकानंद’ (170) नाटकांचे अंदमान ते लद्दाखपर्यंत व अमेरिकेतही प्रयोग सादर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच तास बसून त्यांचे ‘स्वामी विवेकानंद’ हे नाटक बघितले होते, हे विशेष.

विविध भाषेत त्यांच्या साहित्याचे भाषांतर करण्यात आले आहे. शुभांगीताई यांनी वैदर्भीय लेखकांना व्यासपीठ दिण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठाणची स्थापना केली होती. या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्य संमेलने, नाटय़ संमेलने, साहित्य परिषद व चर्चासत्रासारखे उपक्रम यशस्वी पार पाडले. अनेक नव्या लेखकांना लिहिते केले. त्यांच्या संस्थेतर्फे विविध क्षेत्रांतील मान्यवरांना दरवर्षी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आजवर डॉ. जयंत नारळीकर, सुनील गावस्कर, बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, राजदत्त अशा अनेक नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शुभांगी भडभडे शेवटपर्यंत साहित्य क्षेत्राशी संबंध जोडून होत्या. त्यांचे कार्य वैदर्भीयांच्या कायम स्मरणात राहील.