
<<< ब्रिगेडियर हेमंत महाजन >>>
जग ‘युद्धातील तिसरी क्रांती’ अनुभवत आहे, ज्यामध्ये जलद तांत्रिक प्रगती आणि जमीन, समुद्र, हवा, सायबर, अवकाश आणि संज्ञानात्मक क्षेत्रांमध्ये बहु-क्षेत्रीय धोके आहेत. भविष्यातील सैनिक आता पारंपरिक लढाऊ भूमिकांपुरते मर्यादित नसतील, तर त्यांना ‘हायब्रीड वॉरियर्स’ म्हणून काम करावे लागेल, जे ‘माहिती सैनिक’ (info warriors), ‘तंत्रज्ञान सैनिक’ (tech warriors) आणि ‘विद्वान सैनिक’ (scholar warriors) यांचे मिश्रण असतील.
लढाईच्या तंत्रामध्ये होत असलेल्या बदल लक्षात घेऊन, भारतीय सैन्य आपली युद्धक्षमता अधिक बळकट करण्यासाठी ‘रुद्र ब्रिगेड’ (सर्व-शस्त्र ब्रिगेड) आणि ‘भैरव’ लाइट कमांडो बटालियन यांची स्थापना करत आहे. या ब्रिगेडमध्ये पायदळ, यांत्रिक पायदळ, बख्तरबंद तुकड्या, तोफखाना, स्पेशल फोर्सेस आणि ड्रोन युनिट्स यांचा समावेश असेल. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकतीच या दोन नव्या तुकड्यांची घोषणा 26 व्या कारगिल विजय दिनानिमित्त केली आहे.
आधुनिक तंत्रज्ञान-जसे की ड्रोन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. गेली तीन वर्षे सुरू असलेल्या युक्रेन-रशिया युद्धात ड्रोन्स, अँटी-एअरक्राफ्ट शस्त्रे, स्टँड-ऑफ वेपन्स यांच्या मदतीने पारंपरिक फायटर विमाने, मोठी जहाजे, रणगाडे आणि तोफांचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. आकाशात उडणारे छोटे ड्रोन कमी खर्चात, रणगाडे आणि मोठ्या शस्त्रसाठ्यांचा नाश करण्यास सक्षम ठरत आहेत.
नवीन ब्रिगेड व बटालियन
रुद्र ब्रिगेड (All Arms Brigade) आणि भैरव लाइट कमांडो बटालियन यांची स्थापना होत आहे. रुद्र ब्रिगेडमध्ये पायदळ, यांत्रिक पायदळ, बख्तरबंद तुकड्या, तोफखाना, स्पेशल फोर्सेस आणि ड्रोन युनिट्स या सर्व लढाऊ घटकांना एकत्रित उभं केलं जाणार आहे. भैरव बटालियन हे विशेष मिशनसाठी सज्ज राहणारे, हलके व वेगवान युनिट असेल, जे शत्रूच्या पुरवठा लाईन तोडण्यासाठी आणि लक्ष्य नष्ट करण्यासाठी वापरण्यात येईल.
प्रत्येक पायदळ बटालियनला आता ड्रोन प्लाटून दिले जाणार आहे. म्हणजेच, ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), नेटवर्क आधारित युद्ध, रिअल टाइम टार्गेटिंग, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धावर मोठा भर दिला जात आहे.
एकत्रित युद्ध तंत्र
लढाईच्या मैदानावर सर्व सैनिकी घटक (पायदळ, बख्तरबंद, तोफखाना, स्पेशल फोर्सेस आणि ड्रोन) एकत्रित आणि समन्वित पद्धतीने काम करतील. यामुळे वेगवान, प्रभावी आणि बहुआयामी प्रतिसाद दिला जाऊ शकतो. आता ‘फक्त संयम नव्हे, तर धोका जाणवताच त्वरित आणि आक्रमक प्रतिसाद’ हे धोरण आखण्यात आलं आहे. म्हणजेच, केवळ संरक्षण नव्हे, तर शत्रूच्या हालचालींना सक्रियपणे प्रत्युत्तर द्यायचं, असं नवा दृष्टिकोन आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानावर भर
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या स्वार्म ड्रोन, काऊंटर-ड्रोन, क्षेपणास्त्रे यांच्या प्रभावी वापरानंतर, आत्मनिर्भरतेवर जोर देण्यात आला आहे. विविध संयुक्त युद्धसराव (जसे की जपानसोबत ‘धर्मा गार्डियन’) करून भारत जागतिक व्यासपीठावर सैनिकांच्या तांत्रिक कौशल्यांची वाढ करत आहे.
सैन्याच्या नव्या धोरणांमध्ये तांत्रिक नवकल्पना हा एक प्रमुख केंद्रबिंदू झाला आहे. या नवकल्पनांचा भारतीय लष्करामध्ये खालीलप्रमाणे प्रभाव दिसतो ः
ड्रोन्स आणि मानवरहित यंत्रणा
आधुनिक युद्धासाठी स्वदेशी बनावटीचे ड्रोन, स्वार्म ड्रोन, अँटी-ड्रोन सिस्टम मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. यामुळे वास्तविक वेळेत माहिती मिळवणं, अचूक लक्ष्य भेदणं आणि कमी खर्चात ऑपरेशन शक्य झाले आहे. लष्कराने विविध टप्प्यांवर एआय तंत्रज्ञान स्वीकारले आहे, म्हणजेच निर्णय प्रक्रियेतील वेग, गुंतागुंत आणि अचूकता वाढवली जात आहे.
स्वदेशी क्षेपणास्त्र, संरक्षण प्रणाली
ए-400 ट्रायम्फ प्रणाली, स्वदेशी क्षेपणास्त्र (जसे की आकाश, ब्रह्मोस), आणि अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स शील्ड यांचा समावेश केला आहे. यात स्वयंचलित लक्ष्य ओळख, ट्रकिंग आणि नष्ट करणं शक्य आहे. भारतीय सैन्याने माहिती युद्धासाठी सायबर सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि 5G/6G प्रयोगशाळा, कम्युनिकेशनसाठी नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म तयार केले आहेत.
संशोधन व विकास सहयोग
IIT आणि अन्य तांत्रिक संस्थांसोबत लष्कराची भागीदारी अधिक वाढली असून, संरक्षण नवकल्पना, उक्रांतीशील उत्पादने व आत्मनिर्भरता यावर भर दिला जातो. 500 पेक्षा जास्त शस्त्रसामग्री आणि तंत्रज्ञाने यांसाठी ‘Positive Indigenisation List’ तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे आयात टाळून देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळते. नेटवर्क आधारित युद्ध, स्मार्ट हातगोळे, गाईडेड मिसाईल्स, आणि रिअल टाइम डेटा विश्लेषण वापरून युद्धक्षमता वाढवली आहे. या तांत्रिक नवकल्पनांमुळे भारतीय सैन्य अधिक गतिमान, तांत्रिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होत आहे.
भारतीय सेना आता एलएसी (वास्तविक नियंत्रण रेषा) वर आपली ताकद व्यापक स्वरूपात वाढवत आहे. गेल्या काही वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेश, लडाखातील गलवान, पैंगोंग त्सो, डोकलाम या भागांत आपली उपस्थिती आणि पायाभूत सुविधा वाढवल्याने भारतीय सैन्याने या प्रदेशांमध्ये वेगाने तांत्रिक, भौगोलिक आणि धोरणात्मक बदल केले आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये ड्रोन प्लाटून, स्मार्ट सेंसर्स आणि अर्टिफिशियल इंटेलिजेंस वापरून माहिती मिळवण्यावर भर दिला जात आहे. भारतीय सैन्याने “Integral Battle Groups” (IBGs), म्हणजेच एकत्रित पथक तैनात केले आहेत, जे वेगाने प्रतिसाद देऊ शकतात.
भारतीय सैन्य आता ‘फक्त संख्या वाढवणे’ नाही, तर ‘ताकदवान, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वेगवान प्रतिसाद देणारी’ ही भूमिका स्वीकारत आहे, जे बदलत्या युद्धपद्धतींशी सुसंगत आहे. सध्या तैनात असलेल्या इन्फन्ट्री बटालियन आणि ब्रिगेडचे स्वरूप बदलले जात आहे. रुद्र ब्रिगेड किंवा भैरव बटालियन यांचा प्रयोग येत्या काही महिन्यांत केला जाणार आहे. त्यानंतर मूल्यमापन होईल की या नवीन रचना सध्याच्या बटालियन व ब्रिगेडपेक्षा अधिक परिणामकारक आहेत की अजूनही त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.