राजस्थानमधील दरोडेखोरांचा महाराष्ट्रात धुमाकूळ; गुन्हे शाखा घटक 1 ने मुसक्या आवळल्या

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या राजस्थानी दरोडेखोरांच्या गुन्हे शाखा घटक 1 च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या दरोडेखोरांनी ठाणे, नवी मुंबईसह पुणे, संभाजीनगरसारख्या विविध शहरांमध्ये घरफोड्या केल्या असून पोलिसांनी त्यांच्याकडून 7 गुन्ह्यांची उकल केली आहे.

महेंद्रकुमार मेघवाल (28) व गणेश पाटीदार (47) अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थानी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखी एक साथीदार राजेश उर्फ अण्णा कदम (47) यालादेखील अटक केली आहे.

राबोडीतील बाटा कंपाऊंड येथील श्री. सिद्धनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रिब्युटरचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील 51 लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. कोणतेही धागेदोरी नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला. या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागोवा घेत घटक 1 च्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या.

या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली. हे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यापैकी महेंद्रकुमारवर 14 तर राजेश कदमवर 24 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

या पथकाची धडाकेबाज कामगिरी

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, उपनिरीक्षक दीपक घुगे, सहाय्यक उपनिरीक्षक दयानंद नाईक, दीपक जाधव, सुनील माने, संदीप महाडिक, दीपक जाधव, शशिकांत सावंत, बाळू मुकणे, मयूर लोखंडे, सागर सुरळकर पथकाने ही धाडाकेबाज कामगिरी केली.