आपल्या उपराष्ट्रपतींचे नेमके काय झाले आहे? ते कुठे आहेत? चिंता व्यक्त करत संजय राऊत यांचे गृहमंत्र्यांना पत्र

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबाबत चिंता व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी धनकड आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबात चिंता व्यक्त केली आहे. धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांसमोर आलेले नाही किंवा दिसलेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी आता चिंता व्यक्त केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही धनखड यांच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानी पत्र लिहिले आहे.

संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राजीनामा दिल्यानंतर माजी उपराष्ट्रपती कुठेही दिसलेले नाही. दिल्लीतील काही मीडिया रिपोर्टनुसार ते त्यांच्या घरी असून सुरक्षित नसल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत काळजी वाटते आहे. माजी उपराष्ट्रपती नेमके कुठं आहेत? त्यांची प्रकृती बरी आहे की नाही? त्यांच्याबरोबर नेमकं का घडलं? याची माहिती देशाला मिळणं आवश्यक आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती बेपत्ता आहेत. त्यासाठी इंडिया आघाडीचे काही खासदार सर्वोच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार आहेत. पण मला वाटतं की त्यापूर्वी तुमच्याकडून त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पत्र लिहित आहेत, असही संजय राऊत म्हणाले.

21 जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू झाले. सकाळी 11 वाजता राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू केले. अधिवेशनादरम्यान, ते सामान्य दिसले आणि नेहमीच्या पद्धतीने अधिवेशनाचे संचालन केले. त्यांच्या आणि विरोधी पक्षनेते मलिकर्जुन खरगे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावरून असे सूचित होते की त्यावेळी सभापतींची प्रकृती ठीक होती. तथापि, त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर उपाध्यक्षांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर करण्यात आले. हे सर्वांसाठी धक्कादायक होते. परंतु त्याहूनही धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे 21 जुलैपासून आजपर्यंत उपराष्ट्रपतींच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यांचे सध्याचे स्थान काय आहे? त्यांची प्रकृती कशी आहे? या बाबींबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. राज्यसभेच्या काही सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही, ही गंभीर चिंतेची बाब आहे.

आपल्या उपराष्ट्रपतींचे नेमके काय झाले आहे? ते कुठे सुरक्षित आहेत? या प्रश्नांची सत्यता देशाला जाणून घ्यायची आहे. धनकड यांना त्यांच्या निवासस्थानी बंदिस्त करण्यात आले आहे आणि ते सुरक्षित नसल्याचे वृत्त आहे. राज्यसभेतील काही सहकारी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पसची रिट याचिका दाखल करण्याचा विचार करत आहोत, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.