राज्यात भाजपा महायुतीचे लुटेरे सरकार, 40 टक्क्यांनी वसुली सुरू – विजय वडेट्टीवार

राज्यात भाजपा युतीचे लुटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. प्रचंड लुट सुरू असून 40 टक्क्यांचे कमिशन लाटले जात आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आपल्या समोर आव्हाने खूप आहेत, काँग्रेसने सत्ता सर्वोच्च कधीच मानली नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाज घटकांना नजरेसमोर ठेवून काम केले पण भाजपा मात्र फक्त दोन उद्योगपतींसाठी सरकार चालवत आहे. सत्ता ही सामान्य माणसांसाठी असली पाहिजे. लोकांना जोडण्याचे काम करा, तुमची ओळख कामाने, कर्तृत्वाने निर्माण करा. घराघरात जा व लोकांच्या अडचणी, समस्या, प्रश्न जाणून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन काम करा.”