
संस्कृतीचा वारसा जतन करण्यासाठी आणि प्राचीन हस्तलिखांमध्ये असलेले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत, असा सवाल संसदेत विचारण्यात आला होता. त्यावर केंद्रीय सांस्कृतीक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, 2003 पासून एकूण 3.50 लाख हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. आतापर्यंत 92 हस्तलिखित संवर्धन केंद्रे स्थापन झाली आहेत, त्यापैकी 42 सध्या सक्रिय आहेत. याव्यतिरिक्त 93 हस्तलिखित संशोधन केंद्रे आहेत, ज्यापैकी 37 सध्या सक्रिय आहेत, असे त्यांनी सांगितले.
11 सप्टेंबर 1893 रोजी स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या शिकागो भाषणाच्या स्मरणार्थ सप्टेंबर २०२५ मध्ये ज्ञान भारतम मिशनचा भाग म्हणून “हस्तलिखित वारसा माध्यमातून भारताचा ज्ञानाचा वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय हस्तलिखित वारसा परिषद आयोजित करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का असे त्यांना विचारण्यात आले. त्याबाबतही शेखावत यांनी माहिती दिली.
सरकारने सप्टेंबर 2025 मध्ये ‘हस्तलिखित वारसा माध्यमातून भारताचा ज्ञानाचा वारसा पुनर्प्राप्त करणे’ या शीर्षकाची पहिली आंतरराष्ट्रीय हस्तलिखित वारसा परिषद आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेत स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाच्या 132 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारताच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण हस्तलिखित वारशाचा शोध घेण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी जगभरातील विद्वान, इतिहासकार, हस्तलिखित तज्ञ आणि सांस्कृतिक अभ्यासकांना एकत्र आणण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे, असे सरकारने म्हटले आहे. परिषदेचे प्रमुख विषय आणि केंद्रबिंदू हे आहेत – प्राचीन लिपींचे उलगडा: सिंधू, गिलगिट आणि सांखा; सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, मेटाडेटा मानके आणि डिजिटल संग्रहण; हस्तलिखितशास्त्र आणि पॅलेओग्राफी, कोडिकोलॉजी; डिजिटायझेशन साधने, प्लॅटफॉर्म आणि प्रोटोकॉल (HTR, AI, IIF); हस्तलिखितांचे संवर्धन आणि पुनर्संचयितरण; हस्तलिखितांचे उलगडा: भारतीय ज्ञान प्रणालीचे मार्ग; सांस्कृतिक कूटनीतिचे साधन म्हणून हस्तलिखिते; आणि हस्तलिखित जतन आणि प्रवेशासाठी कायदेशीर आणि नैतिक मर्यादा, असे विषय परिषदेत समाविष्ट असतील, असेही त्यांनी सांगितले.