ट्रम्प यांची मोठी घोषणा अन् सोन्याचा भाव 1400 रुपयांनी घसरला; जाणून घ्या आजचे दर…

या वर्षात सोन्याच्या दरात प्रंचड वाढ झाली आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. त्यामुळे सोने-चांदीत गुंतवणूक वाढत गेली. त्यामुळे सोन्याचे भाव लाखमोलावर पोहचले आहेत. तसेच सोने चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, अमेरिकेच्या टॅरिफमुळे जगातील अनेक देश धास्तावले असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे वायदे बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता ट्रम्प यांच्या एका घोषणेने सोन्याच्या वाढत्या दराला ब्रेक लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्याला टॅरिफ लागणार नाही. म्हणजेच ट्ररिफमधून सोन्याला सूट देण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात १४०० रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. मात्र, ही घसरण झाल्यानंतर अजूनही सोने लाखमोलाचेच आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ते एक लाखाच्या वर व्यवहार करत आहे.

वायदे बाजारात सोमवारी सोन्याच्या किमतीत १४०९ रुपये किंवा १.३८% ची घसरण झाली आणि ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १,००,३८९ रुपयांवर आला. यापूर्वी, व्यवहारादरम्यान तो १,०१,१९९ रुपयांवर पोहोचला होता. एमसीएक्सवर सोन्याची आतापर्यंतची उच्च पातळी १,०२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे आणि त्या तुलनेत सोन्याची किंमत १८६१ रुपयांनी स्वस्त आहे. मंगळवारीही वायदे बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच सोने घसरणीसह सुरू झाले.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, सोन्यावर कर म्हणजेच टॅरिफ लावला जाणार नाही. त्यांच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती अचानक मोठ्या प्रमाणात घसरल्या. त्या २.४८% ने घसरून प्रति औंस $३,४०४.७० वर बंद झाल्या. वायदे बाजारात सोन्याचे दर घसरल्याने त्याचा परिणाम सराफा बाजारावरही होणार असून सोने स्वस्त मिळणार आहे. आता सोने त्याच्या उच्चांकी पातळीपेक्षा स्वस्त असल्याने सोने खरेदीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,००,२०१ रुपये होती. बाजार बंद होईपर्यंत ती 1 लाख रुपयांच्या खाली घसरून ९९,९५७ रुपयांवर बंद झाली. म्हणजेच, सोन्याचा दर २४४ रुपयांनी घसरला. इतर गुणांच्या सोन्याच्या किमती पाहिल्या तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,५६० रुपये झाली. त्याच वेळी, २० कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,९६० रुपये आहे.