पाकिस्तानने पातळी सोडली! हिंदुस्थानी दूतावासाचे पाणी, गॅस पुरवठा थांबवला

हिंदुस्थानशी युद्धाच्या मैदानात लढू न शकणाऱ्या पाकिस्तानने आता पातळी सोडली आहे. पाकिस्तानने इस्लामाबादमधील हिंदुस्थानी दूतावासाच्या कर्मचाऱयांना लक्ष्य केलं असून त्याच्या निवासस्थानी होणारा पाणी व गॅस पुरवठा बंद केला आहे. घरी येणारी वर्तमानपत्रेही बंद केली आहेत. पाकिस्तानच्या या कृत्यामुळे दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. तसेच सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली. तो घाव पाकच्या वर्मी लागला आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता अविचारी पावले उचलत आहे. सुइ नॉर्दर्न गॅस पाईपलाईन्स लिमिटेड (एसएनजीपीएल) ने भारतीय उच्चायुक्तालयाच्या परिसरात गॅस पाईपलाईन बसवली आहे, मात्र तेथून होणारा पुरवठा जाणीवपूर्वक थांबवण्यात आला आहे. हिंदुस्थानी कर्मचाऱयांना पुरवठा करू नये असेही पाकिस्तानी अधिकाऱयांनी स्थानिक गॅस सिलिंडर विक्रेत्यांना सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी दूतावासाच्या कर्मचाऱयांना खुल्या बाजारातून चढ्या भावाने सिलिंडरची खरेदी करावी लागत आहे.