
कमळाबाईची बेवफाई सुरूच असून मिंध्यांची अक्षरशः कुचंबणा झाली आहे. रायगडमधील पालक मंत्री पदाचा वाद कायम असतानाच प्रजासत्ताक दिनी रायगड जिह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांना दिल्याने मिंधेंना धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालक मंत्री पदासाठी हट्ट धरून बसलेले भरत गोगावले हे दोघेही आजच्या कॅबिनेटला नव्हते.
शिंदे यांनी थेट श्रीनगरमध्ये मुक्काम हलवला तर गोगावले यांनी दिल्ली गाठून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे राज्यातील भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधात तक्रार केल्याचे वृत्त आहे. तर नाशकात गिरीश महाजन ध्वजारोहण करणार असल्याने संतप्त झालेल्या भुजबळ यांनी गोंदियामध्ये ध्वजारोहण करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त मंत्र्यांना दिलेल्या ध्वजारोहणाच्या जबाबदारीचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला सात मंत्री गैरहजर होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले.
सध्या नाराज असलेले एकनाथ शिंदे तर चार दिवसांपासून कश्मीरमध्ये आहेत. रायगडच्या पालक मंत्री पदासाठी शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले फिल्डिंग लावून बसले आहेत, तर नाशिकच्या पालक मंत्री पदासाठी शिंदे गटाचेच मंत्री दादा भुसे इच्छुक आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन जिह्यांच्या पालक मंत्री पदाचे घोंगडे भिजतच ठेवले आहे.
पालकमंत्री पद मलाच पाहिजे
भरत गोगावले यांनी दिल्ली गाठल्यावर तेथील माध्यम प्रतिनिधींनी त्यांना गाठले. नाराजी व दिल्ली भेटीविषयी विचारले असता, कॅबिनेटला गैरहजेरी, नाराजी तसा काही प्रश्न नाही. वेगळ्या कामासाठी दिल्लीत आलो होतो. कॅबिनेटला येऊ शकत नाही, असे पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. रायगडमध्ये पालक मंत्री पद मलाच द्यावे, अशी इच्छा गोगावले यांनी व्यक्त केली.
शिंदे गट चिडीचूप
‘बॉस’च नसल्याने शिंदे गटाचे मंत्री बैठकीत चिडीचूप होते. आजची मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर साडेदहा वाजता होती. त्यावर कोणी तरी सकाळी याच वेळेला बैठक ठेवा अशी सूचना केली. त्यावर अजित पवार तत्काळ उत्तरले, सकाळी सहा वाजता कॅबिनेट ठेवा, मी येईन. त्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मी सकाळी आंघोळ करून वर्षावरून सह्याद्रीवर येईन, असे म्हटले. त्यावर हास्याची लकेर उमटली.