सह्याद्री अतिथीगृहाजवळ ‘बेस्ट’च्या धडकेत वृद्धेचा मृत्यू

मलबार हिल येथील ‘सह्याद्री’ अतिथीगृहाजवळ आज सकाळी अपघात झाला. धावती बेस्ट बस आणि पार्प केलेल्या कारच्या मध्ये सापडून वृद्ध महिला चेंगरली गेल्यामुळे गंभीर जखमी होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नीता शहा (75) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नीता या योगा क्लास आटोपून पायी घराकडे परतत होत्या. दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथील रस्त्यावर पार्प असलेल्या कारजवळून जात असताना त्याचवेळी कमला नेहरू पार्पच्या दिशेने 105 क्रमांकाची बस चालली होती. परिणामी बस आणि कारच्या मध्ये सापडल्याने नीता यांना बसची धडक बसली. तेव्हा त्या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. नीता यांना तत्काळ उपचाराकरिता जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मृत घोषित केले.