
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पाठिंबा दर्शवला. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देताना न्यायालयाने कबुतरखान्यावर तूर्तास बंदी कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
आज सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, “आमच्यासाठी लोकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. कबुतरांना खाद्य कुठे घालणार ते महापालिकेने सांगावे? पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिलं जाऊ शकत नाही. कंट्रोल फिडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिका घेईल. सगळ्या हरकतींचा विचार करूनच पालिकेने निर्णय घेणं बंधनकारक आहे.”
या प्रकरणी योग्य तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. या समितीत आरोग्य अधिकारी, टाऊन प्लॅनिंगशी संबंधित अधिकारी, इम्युनोलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्ट यांचा समावेश असणार आहे.