
पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुलीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पोलखोल धडक मोर्चा आज काढण्यात आला. या मोर्च्यामुळे प्रशासनाला चांगलाच घाम फुटला होता. आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली होती.
यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षे कर न वाढवण्याचा दिलेला वायदा मोडून, अवास्तव करासह दंड/व्याज आकारणी केली जात आहे. शास्ती माफी म्हणजे फक्त व्याज/दंड माफी, मूळ मालमत्ता करात कोणतीही सूट नाही. पनवेल महानगरपालिका प्रत्यक्षात ‘ड’ वर्गात असूनही, ‘अ’ वर्गातील मुंबई-ठाण्यासारखा कर दर लावला जातो. मुंबई-ठाणे प्रमाणे सुविधा नसताना एवढा जादा कर आकारला जातो. २६८ कोटींचा स्टील मार्केट LBT कर माफ, पण सामान्य जनतेला फक्त व्याज/दंड माफी. नवी मुंबईत २० वर्षांपासून ग्रामपंचायत दराने कर व ५०० चौ. मी. संपूर्ण घरांना करमुक्ती, मात्र पनवेलमध्ये जास्तीचा कर आकारण्यात येत आहे. या संदर्भात जनतेमध्ये संताप असून त्याच्या निषेधार्थ हा पोलखोल मोर्चा काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांनी सुद्धा आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊन नका महागरपालिका कार्यालयाची एकही काच जाग्यवर राहणार नाही, असा इशारा दिला. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत म्हणाले की, पारदर्शक सर्वांना समजणारी करप्रणाली अंगीकारावी, केवळ शास्ती माफी नव्हे तर, मालमत्ता करातही सवलत द्यावी. जनतेच्या खिशावर ताण टाकणारा अवास्तव कर त्वरित मागे घ्यावा. पनवेल महापालिकेचा कर दर, सुविधा व शहराच्या दर्जानुसार न्याय्य ठरावा, हा मोर्चा लोकांच्या हितासाठी असून, सर्व पनवेलकर नागरिकांनी यात सहभागी झाले आहेत.
यावेळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या समोर निवेदन सादर करून पनवेलकरांच्या भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याची मागणी केली. येत्या गणेशोत्सवानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सुद्धा बाळाराम पाटील यांनी यावेळी दिला आहे.