इचलकरंजीत सव्वादोन लाखांच्या बनावट नोटा जप्त; तिघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

इचलकरंजीत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद करून भारतीय चलनातील 2 लाख 24 हजार 200 रुपये किमतीच्या हुबेहूब बनावट नोटा आणि त्या तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य असा एकूण 2 लाख 94 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाने तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिकेत विजय शिंदे (वय 24, रा. पंत मंदिरसमोर, मंगळवार पेठ), राज रमेश सनदी (वय 19, रा. भुईनगर, शहापूर) आणि सोएब अमजद कलावंत (वय 19, रा. परीट गल्ली, गावभाग, तिघे इचलकरंजी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, या तिघांनी या नोटा केव्हापासून बनविण्यास सुरुवात केली आहे. कोठे विक्री करीत होते तसेच यामध्ये त्यांचे आणखी काही साथीदार आहेत का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी भारतीय चलनातील बनावट नोटा बाजारात खपविण्याचे प्रमाण वाढल्याच्या शक्यतेने यामध्ये सक्रिय असणाऱ्या टोळ्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या शोध पथकाकडून माहिती काढण्याचे काम सुरू होते. यानुसार काल बनावट नोटा विक्री करण्यास येणाऱ्या व्यक्तीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत शिंदे याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले.यावेळी त्याच्या खिशात चलनातील काही बनावट नोटा मिळून आल्या.अधिक चौकशीत या नोटा तो त्याच्या राहत्या घरामध्ये छपाई करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी मदत करणारे दोन साथीदार असून, तेसुद्धा त्याच्या घरात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन छापा टाकला असता, 100 रुपये दराच्या 282 नोटा व 500 रुपये दराच्या 392 नोटा असा एकूण 2 लाख 24 हजार 200 रुपये दराच्या बनावट नोटा आणि 70 हजार 700 रुपयांचे वापरलेले साहित्य असा 2 लाख 94 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल आढळला. या बनावट नोटा व साहीत्य पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार संतोष बरगे, प्रदीप पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, योगेश गोसावी, गजानन गुरव, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, राजू कांबळे, अरविंद पाटील, समीर कांबळे, वैभव जाधव यांनी ही कारवाई केली आहे.