स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केली GST बाबत महत्त्वाची घोषणा; म्हणाले की…

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आज ऑपरेशन सिंदूरला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या ऑपरेशनमध्ये शौर्य गाजवणाऱ्या जवानांना सॅल्यूट केला. या भाषणात मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर, राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास आणि कल्याणकारी योजनांबाबत घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 व्या वेळी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आहे. तसेच त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मोदी म्हणाले की, या दिवाळीत सरकार जीएसटी सुधारणा आणत आहे. यामुळे लोकांना करातून दिलासा मिळेल. यासोबतच, आजपासून देशभरात प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून 15000 रुपये दिले जातील. सरकार त्या कंपन्यांनाही प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे देशातील 3.5 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पुढच्या पिढीतील सुधारणांसाठी एक टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे ध्येय आता सर्व प्रकारच्या सुधारणा घडवून आणणे आहे. या दिवाळीत मी तुमच्यासाठी भेट देणार आहे. जीएसटी दरांचा आढावा घेणे ही काळाची गरज आहे. आम्ही नवीन जीएसटी सुधारणा आणत आहोत. सामान्य लोकांसाठी कर कमी केला जाईल. जीएसटी दर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला ऑपरेशन सिंदूरच्या शूरवीर सैनिकांना सॅल्यूट करण्याची संधी मिळाली. देशाच्या वीर सौनिकांनी शत्रुला जबरदस्त धडा शिकवला. पहलगामध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकरे धर्म विचारुन लोकांची हत्या केली, पत्नीसमोर पतीला मारलं, मुलांसमोर वडिलांना मारलं. संपूर्ण हिंदुस्थानात आक्रोश होता. संपूर्ण जगाला या घटनेमुळे धक्का बसला होता. ऑपरेशन सिंदूर त्या आक्रोशाची अभिव्यक्ती आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही आमच्या सैन्याला रणनिती आणि लक्ष्य ठरवण्यासाठी मोकळीक दिला. आपल्या सैन्याने ते करुन दाखवलं, जे अनेक दशकं झालं नव्हतं, असेही ते म्हणाले.

शत्रूच्या प्रदेशात घुसून त्यांची दहशतवादी हेड क्वार्टस धुळीस मिळवली. दहशतवाद्यांच्या इमारती खंडर बनल्या. पाकिस्तानची झोप उडालेली आहे. आपला देश अनेक दशकापासून दहशतवाद सहन करत आहे. देशाच्या छातीवर त्यांनी वार केले. यापुढे आम्ही दहशतवादी आणि त्या दहशतवाद्यांच पालन पोषण करणाऱ्यांना, त्यांना ताकद देणाऱ्यांना वेगळं मानणार नाही. ते मानवतेने शत्रु आहेत. त्यांच्यात काही फरक नाही, असेही त्यांनी ठणकावले.

न्यूक्लियर हल्ल्याच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. न्यूक्लियर ब्लॅकमेल बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. आता ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. पुढेही जर शत्रुने प्रयत्न सुरु ठेवला, तर आमचं सैन्यच योग्य तो निर्णय घेईल. ते लक्ष्य ठरवतील त्यानुसर आम्ही त्याची अंमलबजावणी करु. आम्ही सडेतोड उत्तर देणार, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. या विधानावरून येत्या काळात सिंधू पाणी करार स्थगित राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानी पंतप्रधान आणि त्यांचे अनेक नेते सिंधू पाणी करार पुन्हा सुरू करण्याबद्दल बोलत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांना स्पष्ट इशारा देत पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे.

सिंधू करार किती एकतर्फी आणि अन्याय्यकारक आहे, हे आता देशवासियांना कळलं आहे.हा करार योग्य नाही. सिंधूचं पाणी शत्रूच्या जमिनीला सिंचन करत आहे आणि माझ्या देशाची जमीन तहानलेली आहे. हा कोणत्या प्रकारचा करार होता? त्यामुळे अनेक वर्षांपासून देशाचे इतके नुकसान झाले आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा करार स्वीकारार्ह नाही असं मोदी म्हणाले. संपूर्ण देशाचा आणि शेतकऱ्यांचा सिंधू नदीच्या पाण्यावर अधिकार आहे. जी परिस्थिती सहन केली गेली आहे ती आता सहन करता येणार नाही. हा सिंधू करार मान्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. सिंधू करारावरून दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानाला मोदी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.