असीम मुनीर म्हणजे ओसामा बिन लादेन! अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचे मत अमेरिकन संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले आहे. अल-कायदाच्या माजी प्रमुखाशी असीम मुनीरशी तुलना करत अमेरिकेन संरक्षण तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आता पाकिस्तानमध्येही मुनीरविरोधात असंतोष खदखदत आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुनारला आता अमेरिकेन संरक्षण तज्ज्ञांनीच लक्ष्य केले आहे.

पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि मध्य पूर्व तज्ज्ञ मायकेल रुबिन यांनी म्हटले आहे की, मुनीर हा सूट घातलेला कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करणारे मुनीर यांची तुलना अल-कायदाच्या माजी प्रमुख ओसामा बिन लादेनशी करण्यात आली आहे. मुनीर यांनी ज्या प्रकारे इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांवर अत्याचार केले आहेत, तसे आतापर्यंतच्या कोणत्याच हुकूमशहांनी केले नसतील, असे मतही रुबिन यांनी नोंदवले आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टाम्पा येथे झालेल्या प्रवासी पाकिस्तानींच्या बैठकीत हिंदुस्थानला धमकी देत मुनीर यांनी जी दर्पोक्ती केली होती, त्यावर आत जागतिक पातळीवर प्रतिक्रिया उमटत आहेत. या वक्तव्याबाबत रुबिन यांनी मुनीरवर तात्काळ राजनैतिक कारवाईची मागणी केली आणि म्हटले की पाकिस्तानचा नाटो नसलेल्या प्रमुख मित्र म्हणून असलेला दर्जा काढून घ्यावा आणि दहशतवादाचा प्रायोजक म्हणून घोषित करावा.

रुबिन म्हणाले की मुनीरला पर्सना नॉन ग्राटा घोषित केले पाहिजे आणि त्याचा अमेरिकन व्हिसा बंदी घातली पाहिजे. अमेरिकन संरक्षण तज्ञांनी असेही म्हटले की असीम मुनीरला ही टिप्पणी केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत देशाबाहेर हाकलून लावले पाहिजे होते. अर्थात, कोणत्याही देशाच्या लष्करप्रमुखांसाठी यापेक्षा अपमानजनक काय असू शकते? अमेरिकन संरक्षण तज्ञ रुबिन असीम मुनीरवर संतापले असून मुनीरचा आणि तो पोसत असलेल्या दहशतवादाचा जगाला धोका असल्याचे म्हटले आहे.