
किश्तवाडच्या ढगफुटी दुर्घटनेत आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 100 जण जखमी झाले आहेत. तर 200 जण बेपत्ता आहेत. किश्तवारमध्ये अचानक ढगफुटी झाली आणि चाशोटी गाव उद्ध्वस्त झाले. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमधील चाशोटी भागात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ही आपत्ती माचैल माता मंदिराच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर आली आहे. लोक लंगरसाठी रांगेत उभे असताना ही दुर्घटना घडली आणि अनेकजण पुराच्या पाण्यात वाहून गेले.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीने मोठी आपत्ती ओढवली आहे. गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या किश्तवारमधील चाशोटी भागात ढगफुटीमुळे आलेल्या पुरात 60 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीआयएसएफचे दोन जवानही आहेत. तसेच 200 जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. किश्तवारमध्ये ढगफुटी झाली आणि माचैल माता मंदिराच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर असलेले अनेकजण पुराच्या पाण्यात वाहून गेले.
पोलीस-प्रशासनाकडून सतत बचावकार्य सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकांनी माचैल माता मंदिराजवळून अनेक लोकांना वाचवले आहे. या अपघातात झालेल्या विध्वंसात 100 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 37 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना किश्तवारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे जखमींवर उपचार सुरू आहेत.
माचैल माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या चाशोटी गावात ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी माचैल माता यात्रेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. 9500 फूट उंचीवर असलेल्या माचैल माता मंदिरात जाण्यासाठी भाविकांना फक्त वाहनानेच चाशोटी गावात पोहोचता येते. त्यानंतर त्यांना 8.5 किमी पायी प्रवास करावा लागतो. प्रशासनाने लोकांसाठी अलर्ट जारी केला आहे.