दखल – दैनंदिन जीवनाचे व्यवस्थापन

सतत धावपळ… 24 तास काम केलं तरी काही ना काही तरी राहूनच जातं. घर अस्ताव्यस्त म्हणून जास्त चिडचिड, नोकरी करताना कार्यालयात पोहोचण्यास उशीर म्हणून होणारी मानसिक घुसमट. असं सगळ्यांची मर्जी सांभाळत आयुष्य जगताना स्वतला वेळ देणं जमलंच नाही कधी ही हुरहुर मनाला लागून राहते. आयुष्याची समीकरणं कितीही बदलत असली तरी आपली पाठराखण करणारी आणि प्रत्येक वेळी नव्याने कळत जाणारी असतात. आपण इतरांना बदलू शकत नाही, मात्र स्वतला बदलणं आपल्याच हातात असतं. मग आपणच आपल्या दैनंदिन जीवनाचं आणि आपल्या कामाचं व्यवस्थापन करून आपला विकास घडवून आणावा, त्यासाठी आवश्यक आहे वेळेचे नियोजन. त्याच दृष्टीने काही पुस्तकं आपल्याला मदत करत असतात. त्यातलंच एक म्हणजे कांचन दीक्षित लिखित ‘टाइम अॅण्ड सेल्फ मॅनेजमेंट‘

कांचन दीक्षित केवळ टाइम मॅनेजमेंट शिकवत नाहीत तर एकूणच आयुष्याचं व्यवस्थापन शिकवतात. वेळ आणि आयुष्य याचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी घडय़ाळाचे कुसंस्कार कसे पुसावेत? स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय? वेळेचे गणित सोडवण्याची तंत्र आणि मंत्र कोणती? स्त्राr व पुरुषाचे व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल. लहान लहान यशाने स्वतच स्वतला प्रेरित करण्याची कला शिकून घेतली की, ती आयुष्यभर उपयोगी पडते. संदर्भ बदलले तरी सूत्रं तीच राहतात आणि त्यासाठी हा अनुभवसिद्ध संदर्भग्रंथ वाचकांना सर्वतोपरी मदत करेल.

टाइम अॅण्ड सेल्फ मॅनेजमेंट 

 लेखक : कांचन दीक्षित   प्रकाशक : साकेत प्रकाशन 

 पृष्ठे : 296   मूल्य : रुपये 350