
सातारा जिह्यात पावसाचा हाहाकार सुरू असून, मुसळधार पावसामुळे कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम धरणांतून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, वेण्णा व उरमोडी नदीपात्रातील पाणीपातळी झपाटय़ाने वाढत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उरमोडी धरणातून संध्याकाळी 1000 क्युसेकने वाढ करून एकूण 6155 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. त्यात जलविद्युत प्रकल्पाचा 450 क्युसेकचा समावेश आहे.
धोम धरणात मुसळधार पावसामुळे येवा वाढल्याने विसर्ग 10373 क्युसेकवरून वाढवून 14510 क्युसेक करण्यात आला आहे. या वाढीमुळे वाई गणपती घाटातील छोटा पूल, चिंधवली, मर्ढे व खडकी येथील पूल पाण्याखाली जाणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
कण्हेर धरणातून 4500 क्युसेकने वाढ करून एकूण 11650 क्युसेक पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे. या विसर्गामुळे हमदबाज, किडगाव व करंजे, म्हसवे पूल वाहतुकीसाठी बंद राहतील.
‘कोयना’चे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवर
कोयना धरणक्षेत्रात सलग पावसामुळे धरणातील पातळी धोक्याच्या मर्यादेवर पोहोचली आहे. सायंकाळी 5 वाजता धरणातील एकूण साठा 100.39 टीएमसी (95.38 टक्के) होता. पावसाचा जोर कायम असल्याने सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फूट उघडण्यात आले व 87 हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. विद्युतगृहाचा 2100 क्युसेक विसर्ग धरता कोयना नदीत एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे.