
सोलापूर जिह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरण परीसर व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच उजनी धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. पूर परिस्थिती वाढवू नये म्हणून, उजनी धरणाच्या 16 दरवाजांतून भीमा नदी पात्रात 60 हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. उजनी धरण सध्या 105.25 टक्के भरलेले आहे.
मंगळवारी (दि. 19) सकाळी विसर्ग हळूहळू वाढवण्यात आला.दुपारी 12 वाजता 6 हजार 600 विसर्ग वाढवून सायंकाळी 5 वाजता 25 हजार करण्यात आला. वरील येणाऱया पाण्याच्या विसर्गामध्ये कमी अधिक वाढ केली जाऊ शकत असल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
चंद्रभागेला पूरसदृष्य परिस्थिती
उजनी धरण शंभर टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदीत 60 हजार क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. तर वीर धरण देखील शंभर टक्के भरले असल्याने यातून ही 33 हजार 463 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. हे दोन्ही विसर्ग (43463) संगम येथे एकत्रित येतात. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीला या हंगामात चौथ्यांदा पुरसदृष्य परिस्थित निर्माण झाली आहे. हा विसर्ग बुधवारी सायंकाळपर्यंत पंढरपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.