
खड्डे आणि अपघातांमुळे सतत वादाच्या भोवऱयात असणारा समृद्धी महामार्ग आता इगतपुरीच्या बोगद्यामुळे चर्चेत आला आहे. या महामार्गावरील सर्वात लांबीच्या इगतपुरी बोगद्याजवळ सेल्फी काढण्यासाठी हवशानवशांकडून वाहने उभी केली जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. इगतपुरीच्या बोगद्याजवळ दाटणारे धुके आणि आसपासच्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर काढली जाणारी ही सेल्फी यमराजाची सेल्फी ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
एमएसआरडीसीकडूनच प्रोत्साहन
समृद्धी महामार्गावर वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. वाहने थांबवणाऱयांवर महामार्ग पोलीस दंडाची कारवाई करतात. मात्र महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळच (एमएसआरडीसी) मोटारचालक आणि ट्रकचालकांना जवळच्या लहान धबधब्यांना भेट देण्यास प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येते. तसे बॅनर्स एमएसआरडीसीकडून या महामार्गावर लावले आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. या महामार्गावर मोटारींसाठी तासाला 120 किलोमीटर आणि जड, अवजड वाहनांना तासाला 80 किलोमीटर वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. कोणत्याही महामार्गावर वाहने उभी करण्यास परवानगी नसते, मात्र समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्यापूर्वीचा भाग सेल्फी स्पॉटमध्ये बदलला आहे. सेल्फी काढण्यासाठी वाहने थांबवून लोक रस्त्यावर उतरत आहेत.
इगतपुरीचा आठ किलोमीटर लांबीचा बोगदा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा आहे. तो जुन्या कसारा घाट विभागाला बायपास करतो. तिथे वाहनचालक सेल्फीसाठी पोज देण्यासाठी त्यांची वाहने थांबवताना दिसतात. पावसाळय़ात महामार्गावर धुके दाटत असल्याने दृश्यमानता कमी होते. अशा वेळी वेगाने येणाऱया वाहनांमुळे सेल्फीप्रेमींचा अपघात होण्याचा धोका बळावला आहे.
– इगतपुरी येथील आठ किलोमीटरचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. या बोगद्याची रुंदी 17.61 मीटर इतकी आहे, तर उंची 9.12 मीटर आहे.
– फकॉन्सने बांधलेले 7.78 किमी लांबीचे जुळे बोगदे हे महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदे आहेत.
– इगतपुरी हे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र आहे. ज्यामुळे धुके दाटून जोखीम अधिक वाढते.