उद्घाटनानंतरही विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल बंदच; मुख्यमंत्री आले अन् फित कापून गेले, चार मिनिटांच्या कार्यक्रमामुळे पुणेकर वेठीस

वाहतूककोंडीसाठी सातत्याने चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार चौकातील दुहेरी उड्डाणपुलाच्या एका बाजूचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. त्यांनी फित कापली अन् केवळ 4मिनिटांत कार्यक्रम आटोपून गायब झाले. मात्र, लोकार्पण झाल्यानंतरही हा पूल बॅरिकेड टाकून बंदच ठेवण्यात आला होता. औंधकडून येणारी वाहतूक चतुः शृंगी पोलीस ठाण्याकडून विद्यापीठात वळविण्यात येत होती.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विद्यापीठ चौकात प्रस्तावित केलेल्या दुमजली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा म्हणजेच औंध ते शिवाजीनगर अशा एका बाजूचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला. पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अन्नमंत्री व अधिकाऱ्यांच्या ताफ्यासाठी औंधकडील बाजू आणि विद्यापीठ चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना अडविण्यात आले होते. यामुळे या परिसरात कोंडी होऊन वाहनचालकांना अडकून पडावे लागले. विद्यापीठ चौकात दररोज सायंकाळी वाहनधारकांची मोठी गर्दी होते. तरीदेखील लोकार्पण कार्यक्रम पुलावर आयोजित करण्यात आला होता. त्याकरिता छोटे व्यासपीठ, येणाऱ्या पाहुण्यांसाठी खुर्चा, रेड कार्पेट, पावसामुळे मंडप टाकण्यात आला होता. तसेच पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई, झेंडूच्या फुलांच्या माळा, ढोल-ताशा पथक, सनईवाले अशी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. केवळ चार मिनिटांच्या कार्यक्रमासाठी लाखो, कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.