
नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाइल शोधून परत देण्यात डेक्कन, शिवाजीनगर आणि समर्थ पोलिसांना यश आले आहे. डेक्कन पोलिसांनी 26 मोबाईल, तर समर्थ पोलिसांनी 12 मोबाइल परत मिळवून दिले आहेत. पोलिसांच्या कामगिरीमुळे तक्रारदारांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
डेक्कन भागातून गहाळ झालेल्या मोबाइलची तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती पोलिसांनी संकलित केली. त्याद्वारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, संबंधित मोबाईल विविध ठिकाणांसह परराज्यात वापरात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हे मोबाइल हस्तगत करून ते नागरिकांना परत केले. उपायुक्त ऋषिकेश रावले, एसीपी साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत, उमा पालवे यांनी केली.
मोबाइल गहाळ तक्रारीच्या अनुषंगाने समर्थ पोलिसांनीही तपासाला गती दिली होती. त्यानुसार 8 लाख रुपयांचे 12 मोबाईल तक्रारदारांकडे पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहेत. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांनी समाधान व्यक्त करीत, मोबाइल पुन्हा मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, सुवर्णा जाधव, अविनाश दरवडे, सुनीता खोमणे, अर्जुन कुडाळकर यांनी ही कामगिरी केली आहे. दरम्यान, केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर’ (सीईआयआर) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीवर गहाळ मोबाईलची तक्रार नोंदविण्यात आली होती.
इथे करा तक्रार
गहाळ किंवा हरवलेल्या मोबाईलची तक्रार पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर (www.punepolice.gov.in) येथे करावी. तक्रार नोंदविताना जवळच्या पोलीस ठाण्याचे नाव नोंदवावे. त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारीची प्रत जमा करावी. मोबाईल हरविल्यानंतर तोच मोबाईल क्रमांक वापरावा. नवीन सीमकार्ड सुरू झाल्यानंतर www.ceir.gov.in संकेतस्थळावर नोंद करावी