कोल्हापुरात पंचगंगा धोका पातळीजवळ

गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर किंचित कमी झाला आहे. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला असून, सहा दरवाजांमधून आठ हजार 640 क्युसेक विसर्ग सुरू आहे. मध्यरात्री 39 फुटांची ‘इशारा’ पातळी ओलांडलेल्या पंचगंगेची पाणीपातळी दुपारी चारच्या सुमारास 40 फूट 11 इंच झाली होती. तासाला तीन इंचांची वाढ होत असून, लवकरच 43 फुटांची ‘धोका’ पातळी ओलांडण्याच्या शक्यतेने प्रशासन अधिक ‘अलर्ट’ झाले आहे. सायंकाळी आठ वाजता पंचगंगेची पाणीपातळी 41.7 फूट झाली होती.

‘कृष्णा’ 38 फुटांवर सांगली : कोयना आणि वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत दरतासाने वाढ होत आहे. सांगलीत आयर्विन पुलानजीक संध्याकाळपर्यंत इशारा पातळी गाठेल, अशी स्थिती आहे. दुपारी चार वाजता 38 फुटांवर असणाऱ्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट, पटवर्धन कॉलनी, दत्तनगर परिसरातील घरात पाणी घुसले आहे. या परिसरातील जवळपास दीडशे कुटुंबांतील पाचशे लोकांनी जनावरांसह स्थलांतर केले आहे. सांगली, मिरजेतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.

भीमा नदीत 1 लाख 64 हजारांचा विसर्ग सोलापूर/पंढरपूर : उजनी व वीर धरणाच्या पाणलोटक्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून एक लाख 10 हजार क्युसेक, तर वीर धरणातून 54 हजार 760 क्युसेक असा एकूण एक लाख 46 हजार 360 क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.