
घळभरणीच्या कामात घाई गडबड करुन तसेच नागरिकांवर दबावतंत्राचा वापर करुन काम सुरु केल्याने सदरची पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर नागरिकांनी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीचे काम 20 मे रोजी सुरु करण्यात आले. गावकर्यांना विश्वासात न घेता, पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना, गावकर्यांची निवार्याची व्यवस्था अपुरी झाली असताना ते काम सुरु करण्यात आले. याप्रसंगी या परिसरात 144 कलम लागू करुन गावकर्यांवर दबावतंत्राचा वापर करण्यात आला. आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हसनाळ व मुक्रमाबाद येथे पूरग्रस्तांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांनी याबाबतचा आक्रोश व्यक्त करुन तिडके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा प्रशासन तसेच मंत्रालयातील संबंधित अधिकार्यांना व मंत्र्यांना या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिडके यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सामनाशी बोलताना सांगितले. त्यांच्यावर पूर्ण चौकशी करुन या प्रकरणात नाहक बळी गेलेल्या नागरिकांच्या भावना लक्षात घेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पूर्ण चौकशीनंतर यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. हसनाळसह सहा गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी तयार करण्यात आलेले निवारा कक्ष बोगस असल्याने त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
अंबादास दानवे यांनी याबाबत सर्व संबंधितांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्याबद्दल देखील प्रशासन गंभीर असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी निवारा कक्षाबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत. हे निवारा कक्ष निकृष्ट दर्जाचे, कुठल्याही सोयी सुविधा नसलेले असल्याने त्यावर चौकशी करावी आणि संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.