लेट लतिफांना गेटवरच रोखले ! पालिकेत 550 अधिकारी, कर्मचाऱ्यांना हिसका; कारणे दाखवा नोटीस

महापालिकेत उशिरा हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी गेटवरच अडवण्यात आले. सहा खातेप्रमुखांसह इतर अधिकारी कर्मचारी अशा तब्बल 550 कर्मचाऱ्यांना उशिरा आल्याबद्दल ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी लेट लतिफ सुधारणार का हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. तरीसुद्धा अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या प्रश्नांशी खेळ करत असल्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. अनेक अधिकारी शुक्रवारीच गायब होत असून, प्रत्यक्षात चार दिवसांचा आठवडा पाळत असल्याचे चित्र आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळेतही बेफिकीरपणा केला जात असून, कार्यालये अडीचऐवजी तीन वाजता सुरू होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. महापालिकेत शनिवारीसुट्टीसह पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. मात्र, कामाचे तास वाढवूनही अधिकारी-कर्मचारी वेळेचे पालन करत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती. महापालिकेची वेळ सकाळी 9.45 वाजता असून अनेक अधिकारी दुपारी 12 नंतरही कार्यालयात शिरत होते. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विभागप्रमुखांच्या बैठकीत आयुक्त नवल किशोर राम यांनी वेळेवर कामावर येण्याची ताकीद दिली होती.

याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर म्हणाले, उशिरा आलेल्यांची नावे नोंदवून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे.

भेटीच्या वेळेला केराची टोपली
नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आयुक्तांनी सोमवार व गुरुवार हे दिवस राखून ठेवले आहेत. तसेच विभागप्रमुखांनी नागरिकांना भेटण्यासाठी वेळा जाहीर करून कार्यालयाबाहेर फलक लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे.