
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिर्डी येथील उर्दू शाळेत अधिकार नसताना बेकायदेशीरपणे शिक्षकांच्या पदाला वैयक्तिक मान्यता दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुरुवारी (दि.21) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुलोचना पंढरीनाथ पटारे, तत्कालीन वरिष्ठ सहायक जे. के वाघ (मयत) व शिर्डी उर्दू एज्युकेशन सोसायटी पूनमनगर, शिर्डी (ता. राहाता) या संस्थेचे तत्कालीन सचिव रज्जाक अहमद शेख (मयत) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी विलास साठे यांनी याबाबत फिर्याद दिली.
प्रभारी उपशिक्षणाधिकारी साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासननिर्णय 24 एप्रिल 2023 अन्वये आवक-जावक नोंदवहीचा शोध घेऊनही ती मिळत नसल्यास या प्रकरणाची सखोल तपासणी करून जबाबदार व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार दोषी असणारे अधिकारी व कर्मचारी यांची नावे, पदनाम, निश्चित करून जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिले होते.
साठे व त्यांच्या समितीने चौकशी केली असता, शिर्डी उर्दू एज्युकेशन सोसायटी, पूनमनगर, शिर्डी यांच्या इकरा उर्दू शाळेतील चार शिक्षकांमध्ये खान जरीन मुख्तार, सय्यद समिना शब्बीर, शेख आस्मा रजाक व शेख नियाजउद्दीन सल्लाउद्दीन यांना 2014 मध्ये वैयक्तिक मान्यता देण्यात आली होती. मात्र, ही मान्यता विहित कार्यालयीन कार्यपद्धती न वापरता, थेट प्रस्ताव घेऊन तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि संबंधित कर्मचारी यांनी दिल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, वरिष्ठ सहायक वाघ (मयत) व तत्कालीन संस्थेचे सचिव रजाक अहमद शेख (मयत) यांनी खोटे जावक क्रमांक वापरून आणि खोटे दस्ताऐवज तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे.
2016 पर्यंत शिक्षकांना वैयक्तिक मान्यता नव्हती, तरीही 2014 च्या नोंदीमध्ये खोटे आदेश दाखवून शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरीत बसविण्यात आले. अशाप्रकारे बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख अधिक तपास करत आहेत.