गणरायाची प्राणप्रतिष्ठा दुपारी 1.54 पूर्वी करा!

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाचे आगमन बुधवारी होत आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्य आणि उत्सवी वातावरण आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू असून पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करण्याची शुभवेळ सांगितली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजून 25  मिनिटे ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि षोडशोपचार पूजा करावी, असे सोमण यांनी म्हटले आहे.

बुधवारी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी गणेशभक्तांना शुभ वेळेची माहिती दिली आहे. पूजेसाठी ठेवलेली गणेशमूर्ती मातीचीच हवी, आपण स्वतः पुस्तकावरून गणेशपूजन करू शकतो, महिलांनाही गणरायाचे पूजन करता येईल. सजावटीसाठी थर्माकोलसारख्या पर्यावरणास घातक गोष्टींचा वापर करू नये, अगरबत्ती, धूप, कापूर हे पूजेचे साहित्य केमिकलमुक्त असावे, असा सल्लाही सोमण यांनी गणेशभक्तांना दिला आहे. याचवेळी त्यांनी ज्येष्ठा गौरी पूजन आणि विसर्जनाचा मुहूर्तही जाहीर केला. गौरी ही गणपतीची माता पार्वती. तिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरडय़ाच्या, खडय़ांच्या, मुखवटय़ांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात. भक्तांनी 31 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजून 25 मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरी आणाव्यत आणि 1 सप्टेंबरला पूजन करावे. तसेच 2 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 50 मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे, असे आवाहन दा. कृ. सोमण यांनी केले आहे.

पुढच्या वर्षी 18 दिवस उशिराने बाप्पा येणार

यंदा गणरायाचे आगमन लवकर झाले आहे. पुढच्या वर्षी मात्र गणेशभक्तांना सप्टेंबरची वाट पाहावी लागणार आहे. 2026 मध्ये गणरायाचे आगमन 18 दिवस उशिराने होणार आहे. पुढील वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 रोजी असेल, असे सोमण यांनी जाहीर
केले.