प्रासंगिक – नाणे घाटातील लेणी

<<< ज्ञा. भि. गावडे >>>

शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर आहे. या शहराजवळील नाणे घाटातील डोंगररांगांतील डोंगरांमध्ये त्या काळच्या राज्यकर्त्यांनी अतिशय सुंदर लेणी कोरल्याचे आजही आपल्याला पाहावयास मिळतात. मध्ययुगापूर्वी प्राचीन काळातील ही लेणी आहेत. ज्येष्ठ पुरातत्व अभ्यासक डॉ. शोभला गोखले मॅडम यांनी या लेण्यातील शिलालेखांचे वर्णन केलेले आहे. महारठी हा शब्द म्हणजेच महाराष्ट्र हा उल्लेख या शिलालेखात केल्याचे सापडलेले आहे. अंदाजे 2027 वर्षांपूर्वी नाणे घाटाची निर्मिती राणी नागगणिकेने केली असावी. या शिलालेखात महारठी शब्दाचा उल्लेख वारंवार केल्याचे आढळून येते. हे महारथी म्हणजेच आजचे मराठी असे स्पष्ट म्हणावेसे वाटते.

‘महारठी अंगीय कुल वधनस सगरगिरीवलयाय पथविय प्रथम विरस बस य महती मह’ असे वाक्य या शिलालेखात कोरल्याचे आढळून येते. महारठी अगीय कुलातील गिरी समुद्र वलयांकित पृथ्वीवरील विरश्रेष्ठ असा पुरुष, असा अर्थ या वाक्याचा आहे. मराठी ही अतिप्राचीन, अभिजात भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी हाच दोन हजार वर्षांपूर्वीचा पुरावा ग्राह्य धरला जात आहे. हाच महारठी प्रदेश म्हणजेच आजचा महाराष्ट्र होय. त्याचप्रमाणे सातवाहन कुलातील राजा हाल याने प्राकृत भाषेतील ‘गाथा सप्तशती’ हा ग्रंथ लिहिलेला असून महाराष्ट्राचा आद्यग्रंथ मानला जातो. त्या वेळच्या महाराष्ट्राचे जनजीवन तसेच विविध रूपे या ‘गाथा सप्तशती’ या काव्यग्रंथात वाचावयास मिळतात. नाणे घाटातील लेण्यांसारखीच अनेक लेणी पुण्याजवळ मळवळीच्या डोंगरात, सातारा जिह्यातील पालपेशवारीची लेणी, मुंबईतील बोरिवली पूर्वमध्ये असलेली कान्हेरी लेणी, बोरिवली पश्चिममध्ये असलेली मंडपेश्वर लेणी व मुंबईत गेट वे ऑफ इंडियापासून जवळच घारापुरी (एलिफंटा) तसेच आता अहिल्यानगर जिह्यातील खुलताबाद व अन्य ठिकठिकाणी दऱ्याखोऱ्यात अजूनही लेणी वा शिलालेख सापडण्याची शक्यता असू शकते, पण आड वळणावर आणि दुर्गम भागांतही असू शकतात. त्यामुळेच ती आम जनतेच्या लक्षात आली नसावीत.

जुन्नरजवळील नाणे घाट हा लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि हेच जुन्नर एकेकाळी सातवाहन राजवटीची एक प्रमुख बाजारपेठ होती. या राजवटीचा गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स. 106 ते 130) हा राजा होऊन गेला. यवन (ग्रीक) आणि पहलव अशा परकीयांना नेस्तनाबूत करणारा आणि दक्षिण भारताभोवतीच्या तीन समुद्रांपर्यंत साम्राज्य विस्तार साधणारा महापराक्रमी सम्राट तो होता. सातवाहनाच्या काळात ‘गाथा सप्तशती’ नामक सुप्रसिद्ध प्राकृत भाषेतील 700 गाथांचा संग्रह तयार झाला होता. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, महाराष्ट्र राज्याचा इतिहास सातवाहनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.