हिंदुस्थान महिलांसाठी असुरक्षित, जगभर प्रवास करणाऱ्या महिला इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ व्हायरल

हिंदुस्थानी ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर तन्वी दीक्षित हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तन्वीने सोलो ट्रॅव्हलिंगवरून एक मोठे विधान केले आहे. मी आतापर्यंत खूप देशांतून प्रवास केला, परंतु यामध्ये महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश हिंदुस्थान आहे, असे तन्वीने म्हटले आहे. हिंदुस्थानात सोलो ट्रव्हल करताना महिलांना सर्वात जास्त सावधानता बाळगावी लागते, असे तन्वीने म्हटले आहे. तन्वीच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. तन्वीने वेगवेगळ्या देशांत केलेल्या ट्रॅव्हलिंगवेळी महिलांच्या सुरक्षेला 10 पैकी रेटिंग दिली आहे. या यादीत व्हिएतनाम आणि थायलंड हे देश सर्वात सुरक्षित असल्याचे म्हटले आहे, तर हिंदुस्थान आणि इंडोनेशिया हे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

केवळ दोन रेटिंग

तन्वीने आपल्या व्हिडीओत हिंदुस्थानला 10 पैकी केवळ 2 रेटिंग दिली आहे. ही रेटिंग देताना माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत, असेही तन्वीने म्हटले आहे. महिलांनी प्रवास करताना जास्त खबरदारी घ्यायला हवी, असेही तन्वीने म्हटले आहे. हिंदुस्थानातील परिस्थिती लवकरात लवकर बदलेल अशी मला आशा आहे, असेही तिने आपल्या व्हिडीओत म्हटले आहे.