
जुलै महिन्यानंतर काही काळा विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या आठवड्यापासून चांगलीच बरसायला सुरुवात केली आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे गेल्या आठवड्यात मुंबई ठप्प झाली होती. त्यानंतर आता सर्वचजण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असताना वरुणराजाही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबई-ठाण्यासह 6 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
बाप्पाचे बुधवारी स्वागत करण्यासाठी राज्यभरात तयारी जोरात सुरू आहे. यावेळी वरूणराजा हजेरी लावणार आहेच. मात्र त्याआधी मंगळवारी कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात गेल्या आठवड्यापासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. आता मुंबईसाठी मंगळवारी हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दुपारी आणि संध्याकाळी मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईप्रमाणेच नवी मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात घाट भागात पावसाचा जोर अधिक राहील. नवी मुंबईतील खाड्यालगतच्या भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात या आठवड्याची सुरुवातच जोरदार पावसाने झाली आहे. त्यामुळे मंगळवारी पालघर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
📢 26h to 29th Aug, possibility of mod to heavy rains over parts of #Konkan & #ghat areas of M Mah as per the guidance of IMD model & forecast including #Mumbai, #Thane. 29th #interior of state to possibility of mod showers.
Keep watch on IMD alerts. #FestivalSeason. pic.twitter.com/UWbuC3JGjo— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 25, 2025
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन कोकण जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार सरींचा अंदाज असून, काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २९ ऑगस्टला मुंबई, ठाणे यासह कोकण आणि घाट माथ्यावर भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २९ तारखेला राज्यातील अंतर्गत भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.