सन्नाटा आणि ढिगाऱ्याखाली दबलेले संसार.. ‘रमाबाई’चे बचावकार्य 40 तासांनंतर थांबले

रमाबाई अपार्टमेंट’ या चार मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 बळी गेले तर 9 जण जखमी झाले. वसई-विरार पालिकेचे अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाचे बचावकार्य 40 तासांनंतर थांबले. आता घटनास्थळी उरला तो फक्त सन्नाटा आणि रमाबाईतील कुटुंबांचा ढिगाऱ्याखाली दबलेला संसार.. मृतांचे नातेवाईक आज जड अंतःकरणाने विखुरलेल्या संसाराचे अवशेष शोधत होते. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

रमाबाई अपार्टमेंट मंगळवारी मध्यरात्री कोसळल्यानंतर हाहाकार उडाला. या परिसरात दाटीवाटीने इमारती उभ्या असल्याने तेथे मशिन्स पोहोचू शकत नव्हत्या. त्यामुळे ढिगारा हालवण्याचे काम हाताने करावे लागले. दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने एनडीआरएफचे पथक विरारमध्येच असल्याने हे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यामुळे काही जणांचे प्राण वाचवता आले. त्यानंतर दुसरे पथक मुंबईहून दाखल झाले. एनडीआरएफच्या पथकाकडून लाईव्ह डिटेक्टर, रेस्क्यू रडार, श्वान पथकाचा वापर करण्यात आला.

चाळी रिकाम्या केल्या
ज्या चाळीवर रमाबाई अपार्टमेंट कोसळली सुदैवाने ती चाळ रिकामी होती. त्यामुळे आणखी मोठी प्राणहानी टळली. आता आजूबाजूच्या दुसऱ्या चाळींना रिकामे करण्यात आले असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी विवेकानंद कदम यांनी सांगितले.

म्हाडाची 60 घरे मिळणार
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेघर झालेल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात म्हाडाची 60 घरे मिळणार आहेत. बोळींज येथील म्हाडा प्रकल्पातील ही घरे असून या बाधित रहिवाशांना दोन दिवसांकरिता राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. तशा अधिसूचना म्हाडाच्या उपाध्यक्षांना देण्यात आल्याचे परिवहनमंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.