
गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक मंडपांमध्ये दर्शनासाठी रांगा लागत आहेत. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंडळांकडून मंडपाबाहेर सूचना फलक लावलेले दिसतात. त्यावर कधी शिस्तीसंदर्भात सूचना असतात, तर कधी नियम असतात. अशीच एका मंडळाने लावलेली एक पाटी व्हायरल होत आहे. ओळखीचा फायदा घेऊन रांगेत उभे न राहता आता दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सूचना पाटी आहे. एका गणपती मंदिराबाहेर ती लावली आहे. यावर लिहिलेय, ‘दर्शनाला रांगेतच जावे. कारण वशिल्याच्या चोरवाटा मूर्तीपर्यंतच नेतात, देवापर्यंत नाही.’ बऱ्याचदा ओळखीने लोक थेट मूर्तीपर्यंत पोहोचतात. मात्र अशा वेळी तुम्हाला मूर्ती तर दिसेल, पण चुकीच्या मार्गाने आल्यामुळे देव मात्र भेटणार नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिराबाहेरील ही पाटी चांगलीच व्हायरल होत आहे.