
मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा हा आदेश अमित शहा यांचा आहे. भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही. एकनाथ शिंदेंनीही मुंडी हलवून किंवा दाढी हलवून त्याला मान्यता दिली. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठी महापौर होईल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
राज ठाकरेंबरोबरची मैत्री कमी झाल्याचे विधान एकनाथ शिंदे यांनी केले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, या सगळ्यांचा मैत्री मागचा हेतू एकच होता की दोन बंधू एकत्र येऊ नये. त्यांच्यात कायम वितुष्ट राहावे, दुरावा राहावा म्हणून त्यांची मैत्री सुरू होती. पण आता ‘दूध का दूध, पानी का पानी’ झाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्याने त्यांना आता असे वाटते की आपली गरज संपली. कुणाचेही न ऐकता, दबाव झुगारता दोन बंधू एकत्र आले आहेत. त्यांच्यामुळे जे व्यवासायिक किंवा तथाकथित स्वार्थी मित्र होते ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात.
मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा हा अमित शहा यांचा आदेश आहे. म्हणजे मराठी माणसाची उरलीसुरली मुंबई ताबडतोब गिळून टाका. अमित शहा आले तेव्हा शिंदे त्यांच्या मागे शेपूट हलवत फिरत होते. हे भाजपचे लोकं किंवा त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शहांचा त्यांना स्पष्ट आदेश आहे की, इथे भाजपचा महापौर व्हायला पाहिजे. त्याच्यावरती हा माणूस काही बोलला का? शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा, इथे मराठी माणूस महापौर होईल, असे बोलला का? तुमच्या तोंडामध्ये शहांना काय कोंबले सांगा? तुमच्या बैठकांमध्ये भाजपचा महापौर व्हायला हवा असे सांगतो. म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा. शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते सोडून द्या, पण तुम्हाला शहांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चोरून दिली त्याचे तरी भान राखा, असेही राऊत यावेळी म्हणाले.
‘अरे, भल्या माणसा! मुंबई मराठी माणसाची नाही काय?‘, या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखाबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, दक्षिण मुंबईत श्रमिकांना, कष्टकऱ्यांना येऊ देऊ नका असे मिलिंद देवरा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. आंदोलन करणारे हे सगळे मराठी लोक असतात. शिक्षक असतात, कामगार असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात. यात कुणीही अदानी, अंबादनीची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलेही नसतात. त्यांना येऊ देऊ नका अशा प्रकारचे पत्र शिंदेंचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचे मराठी प्रेम आणि मराठी अस्मिता. याच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि शहांचे जो पक्ष आहे शिंदे गट त्यांनी मत व्यक्त केले असते तर आनंद झाला असता. अशा खासदाराची हकालपट्टी करायला पाहिजे होती. पण त्यांनी साधे मतही व्यक्त केले नाही.
मिलिंद देवरा यांनी पत्र का लिहिले, तर मनोज जरांगे-पाटील यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्यांना त्रास झाला. जरांगे म्हणतात की, शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे. त्या बिचाऱ्याच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. ते बाळासाहेबांच्या नावाने मतं मागतात. आमची शिवसेना खरी असे ढोंग करतात. मुंबई मराठी माणसाची आहे आणि तो न्याय्य हक्कांसाठी कुठेही जाऊ शकतो हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? दक्षिण मुंबईत हुतात्मा स्मारक आहे. दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला. 105 हुतात्म्यांपैकी बहुसंख्य हुतात्मे त्याच दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला तथाकथित भला माणूस त्याच्यावर काही बोललेला नाही. कुणाला घाबरतोय? अमित शहांना? मराठी माणसाची बाजू घेतली तर त्यांना काय वाटेल, असे काही असेल तर सांगा, असेही राऊत शिंदेंना उद्देशून म्हणाले.
दक्षिण मुंबईत आंदोलनांवर बंदी घाला, शिंदे गटाचे खासदार देवरा यांचे पत्र