
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा (बॅलेट पेपर) वापर करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला (SEC) केली आहे. कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. ईव्हीएमची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे आणि मतदार यादीतील त्रुटींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
एच.के. पाटील म्हणाले, “ईव्हीएमची विश्वासार्हता आणि लोकांचा त्यावरील विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्यात, अशी शिफारस मंत्रिमंडळाने केली आहे. याशिवाय, मतदार यादी तयार करण्याचे, सुधारणा करण्याचे आणि आवश्यक असल्यास पुन्हा तयार करण्याचे अधिकारही राज्य निवडणूक आयोगाला देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी कर्नाटक पंचायत राज कायदा, नगरपालिका कायदा आणि ग्रेटर बेंगलोर प्राधिकरण कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
हा निर्णय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात विशेषतः बेंगलोर सेंट्रलमधील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात मतदार यादीत गोंधळ आणि मतचोरी झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.