
आग्रा येथील ताजमहाल यमुना नदीच्या किनाऱ्यालगत आहे. मुसळधार पावसामुळे यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा अडीच फूट वर गेली आहे. यमुनेचे पाणी ताजमहालच्या भिंतींना स्पर्श करत आहे. या पाण्याचा ताजच्या बांधकामाला फायदा होईल की नुकसान, याची चर्चा आता होऊ लागलेय. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विश्वास वाटतोय की, या पाण्यामुळे ताजला नुकसान होण्याऐवजी फायदा होईल. वरिष्ठ संवर्धन सहायक प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितले की, पाण्याच्या पातळीवर आमचे लक्ष आहे. त्यावर अहवाल तयार करून उच्च अधिकाऱ्यांना पाठवला जाईल. त्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जातील.
संरक्षित स्मारकांना धोका
यमुनेचे पाणी ताजमहालच्या मागील भिंतीपर्यंत पोहोचले आहे. मंटोला नाला भरल्याने आग्रा किल्ल्याचा खंदक तीन फूट पाण्याने भरला आहे. एत्माउदौला स्मारकाच्या मागे असलेल्या 12 खोल्या पाण्यात बुडाल्या आहेत. ताज व्ह्यू पॉईंटपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे संरक्षित स्मारकामध्ये ओलाव्याचा धोका आहे.
पाणी पातळीत वाढ
सध्या विविध बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत असल्याने यमुनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शहरातील दोन मोक्षधाम पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जागा नाही. नागरिकांना पाण्यात उभे राहून अंत्यसंस्कार करावे लागले.
रस्ते, वस्त्या पाण्याखाली
दयालबाग परिसर, अमर विहार, राज श्री अपार्टमेंट ते सिंकदरपूर रोडपर्यंत रस्ते पाण्याने भरेल आहेत. कैलास मंदिराच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. मेहरा नाहरगंजमध्ये 40 कुटुंबांना स्थलांतर करावे लागले.