मोनोरेलच्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच! स्थानक, प्लॅटफॉर्मवर पुरेसे गार्ड नाहीत, सुविधांचीही बोंब

जादा प्रवासी संख्येमुळे मोनोरेलचा एक रेक झुकल्याची घटना घडल्यानंतरही एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गर्दी नियंत्रणासाठी स्थानक परिसर तसेच प्लॅटफॉर्मवर पुरेसे सुरक्षा रक्षक अद्याप तैनात केलेले नाहीत. अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवासी सुविधांची बोंब आहे.

19 ऑगस्ट रोजी मैसूर काॅलनी स्थानकादरम्यान मोनोरेलचा एक रेक जादा प्रवासी संख्येमुळे खाली झुकला. त्यात 500 हून अधिक प्रवासी अडकले होते. या घटनेला दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही एमएमआरडीए प्रशासन मोनोरेलच्या सुरक्षेबाबत सुस्त राहिले आहे. बहुतांश स्थानकांत जादा सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. मागील दहा दिवसांत अनेक गणेशभक्तांनी मोनोरेलमधून चेंबूर ते दक्षिण मुंबई प्रवास केला. गणेशभक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊनही एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेबाबत गांभीर्य दाखवले नाही.

ग्राहक सेवा केंद्रात कर्मचारीच नाहीत

एमएमआरडीएने प्रवाशांच्या सोयीसाठी मोनोरेलच्या स्थानकांत ग्राहक सेवा केंद्रे कार्यान्वित केली. मात्र सध्या या केंद्रात कर्मचारीच बसत नसल्याचे चित्र लोअर परेल स्थानकात दिसले. इंडिकेटर्सवरही गाडय़ांबाबत आगाऊ सूचना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना संभ्रमावस्थेत राहावे लागते. प्लॅटफॉर्मलगत उभारलेल्या जाळय़ांचा काही भाग खुला असल्याने मुले ट्रकशेजारी जाण्याचा धोका अधिक आहे.

तिकीट खिडक्यांच्या परिसरात अंधार

दक्षिण मुंबईतील मोनोरेलचे लोअर परेल स्थानक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. येथून पश्चिम आणि मध्य रेल्वेला जाणाऱ्या प्रवाशांची ये-जा सुरू असते. लोअर परेलसह अनेक स्थानकांतील तिकीट खिडक्यांच्या परिसरात पुरेशा लाईटस्ची व्यवस्था नाही. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना अंधारातून जावे लागते. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.