हिमाचलमध्ये डोंगर नदीत कोसळला, देशात पावसाचा कहर सुरूच; जनजीवन विस्कळीत

देशात गणेशोत्सव काळात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अद्यापही हे सत्र थांबलेले नाही. संपूर्ण देशात पावसाचा कहर सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान एनडीआरएफ, एसडीआरएफसह पोलीस आणि प्रशासन मदतकार्यात व्यस्त आहे. यादरम्यान आतापर्यंत 366 जणांचा बळी गेलेल्या हिमाचलमध्ये शनिवारी नौहराधर भागात संपूर्ण डोंगरच नदीत कोसळला. या ठिकाणी लोकवस्ती नसल्याने जीवितहानी टळली असून मोठा अनर्थ टळला.

राजस्थानमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, धरणे आणि तलाव दुथडी भरून काहू लागले आहेत. शनिवारी उदयपूर शहरातून वाहणाऱ्या आय्याड नदीच्या पाण्यात लोक अडकले. वसाहत पाण्याखाली गेली, लोक छतावर पोहोचले. राजसमंदच्या रिचेड भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग-162 (राजसमंद-जोधपूर) चा अर्धा भाग वाहून गेला. यामुळे महामार्ग बंद झाला.

उत्तर प्रदेशात पाऊस आणि पूर सुरूच असून, शाहजहांपूरमधील दिल्ली-लखनऊ महामार्ग पुराच्या पाण्यात बुडाला. प्रयागराजमध्ये गंगा-यमुना नद्यांची पाण्याची पातळी काढत आहे. ललितपूरचे माटाटिला धरण भरून वाहू लागले, ज्यामुळे 20 दरवाजे उघडण्यात आले. त्याचवेळी, गेल्या अनेक दिवसांपासून पिलीभीतमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये पावसासाठी रेड अलर्ट, गोव्यात ऑरेंज अलर्ट तर मध्य प्रदेश-बिहारसह 20 राज्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला.