
ज्येष्ठ साहित्यिका नलिनी कुलकर्णी यांचे शहापूर येथे निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. नलिनी कुलकर्णी-सरदेशमुख याआधी गोरेगावात वास्तव्यास होत्या. मुलांच्या लाडक्या शिक्षिका होत्या. काही वर्षे त्या आकाशवाणी मुंबईवर गंमत-जंमत कार्यक्रम सादर करायच्या. शास्त्रीय संगीतावर त्यांचे मनस्वी प्रेम होते, त्या सतार वाजवत.
नलिनी कुलकर्णी ‘जागर’ हस्तलिखित अंक गेली 25 वर्षे सातत्याने प्रकाशित करत म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली आहे. त्यांच्या ‘जागर’ अंकाचे अनेक मान्यवर साहित्यिकांनी कौतुक केले होते, तसेच त्यांच्या दिवाळी अंकाला पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. गोरेगावच्या अत्रे कट्टय़ावर त्यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली होती.