फ्रान्समध्ये 9 महिन्यांत सरकार कोसळले!

फ्रान्समध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अवघ्या 9 महिन्यांत फ्रान्समधील फ्रँको बायरू यांचे सरकार कोसळले आहे. देशाच्या संसदेत सरकारविरोधात आलेला अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

बायरू यांनी सरकारी खर्चाला कात्री लावणारी योजना आणली होती. सरकारी खर्च कमी करण्याबरोबरच दोन सार्वजनिक सुट्टय़ा रद्द करून 51 अब्ज डॉलरची बचत करण्याची ही योजना होती. या योजनेला विरोध करत थेट अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. संसदेतील एकूण 364 खासदारांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले तर, अवघे 194 खासदार ठरावाच्या विरोधात पंतप्रधानांच्या बाजूने उभे राहिले. सरकारला सत्तेतून बाहेर करण्यासाठी 280 मतांची गरज होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक मते त्यांच्या विरोधात गेली.