BRS कडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार; केटीआर यांनी दिली माहिती

देशात उपराष्ट्रपतीपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीवर भारत राष्ट्र समिती (बीआरएसने) बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (केटीआर) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. युरिया टंचाईचा उल्लेख करत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोघांनीही तेलंगणातील शेतकऱ्यांची फसवणीक केल्याचा आरोप केटीआर यांनी केला आहे. याचा निषेध करत आपल्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

तेलंगणा भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या २० दिवसांपासून बीआरएस राज्य आणि केंद्र सरकारांना युरियाच्या कमतरतेबद्दल इशारा देत आहे. तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्याचा निषेध म्हणून आणि तेलंगणातील ७१ लाख शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बीआरएसने उपराष्ट्रपती निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत नोटा हा पर्याय असता तर आम्ही तो निवडला असता, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस सरकार सार्वजनिक निधी लुटण्यासाठी प्रकल्पाचा खर्च वाढवत असल्याचा आरोप केला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की बीआरएसच्या काळात कोंडापोचम्मा सागर येथून गोदावरीचे पाणी हैदराबादला आणण्यासाठी १,१०० कोटी रुपयांचा अंदाज तयार करण्यात आला होता, तो आता रेवंत यांच्या राजवटीत ७,३९० कोटी रुपयांपर्यंत वाढवला गेला आहे, असे सांगत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली.