अदानींच्या सिमेंट फॅक्टरीला भूमिपुत्रांचा विरोध; प्रदूषणामुळे टिटवाळा, मोहने, आंबिवलीतील जमिनी नापीक होणार

कल्याणनजीक मोहने परिसरात अदानी समूहाकडून उभारण्यात येणाऱ्या सिमेंट फॅक्टरीविरोधात भूमिपुत्र एकवटले आहेत. एनआरसी कारखान्याची जमीन विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्प सुरू करणार नाही अशी हमी अदानी व्यवस्थापनाने दिली होती. मात्र अदानी समूह या ठिकाणी सिमेंट फॅक्टरी उभारणार असल्याची कुणकुण लागताच टिटवाळा, आंबिवली, मोहने, बल्याणी परिसरातील भूमिपुत्रांनी बैठक घेतली. प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात येण्याबरोबरच परिसरातील जमिनी कायमच्या नापीक होणार असल्याने सिमेंट फॅक्टरीचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार भूमिपुत्रांनी यावेळी केला.

मोहने येथील नालंदा बुद्ध विहारच्या सभागृहामध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात हरकती घेण्याचा निर्धार करण्यात आला. याशिवाय रस्त्यावरची लढाई म्हणून सिमेंट फॅक्टरीविरोधात तीव्र आंदोल न छेडण्याचा निर्णयही घेण्यात आला.

दया शेट्टी, मयूर पाटील, दशरथ तरे, विजय काटकर, भीमराव डोळस, जनार्दन पाटील, सुनंदा कोट, संगीता गायकवाड या माजी नगरसेवकांनी भूमिपुत्रांच्या लढ्याला पाठिंबा दिला. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, मिलिंद गायकवाड, सुकुमार दामले, उदय चौधरी आदी उपस्थित होते.

पुढील पिढ्या बरबाद होतील

सिमेंट फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात जल, ध्वनी आणि वायूप्रदूषण होऊन शेतजमिनी नापीक होणार आहेत. शिवाय जलस्रोत बाधित होणार असल्याने पुढील पिढ्या वाचविण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्रित लढा दिला नाही तर आपल्या पिढ्या बरबाद होतील अशी भीती श्याम गायकवाड यांनी व्यक्त केली.